#MeTooवर शक्ती कपूर म्हणतोय, मोदीसाहेब तुमच्यावर आरोप झाल्यास तुम्ही काय करणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:20 IST2018-10-15T15:10:48+5:302018-10-15T15:20:20+5:30
शक्ती कपूर यांनी #MeToo या मोहिमेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या सगळ्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे शक्ती कपूर यांचे म्हणणे आहे.

#MeTooवर शक्ती कपूर म्हणतोय, मोदीसाहेब तुमच्यावर आरोप झाल्यास तुम्ही काय करणार ?
मीटू या मोहिमेद्वारे आता महिला लैंगिक अत्याचाराबद्दल मोकळेपणानं बोलू लागल्या आहेत. तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये या मोहिमेला सुरुवात झालीय. या मोहिमेची सध्या जोरदार चर्चा असून, बॉलिवूड, क्रीडा, राजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांची नावे या मोहिमेंतर्गत घेण्यात आली आहेत. सोशल मीडियाद्वारे अनेक जण या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. बॉलिवूडमधील अनेकांनी मीटू या मोहिमेत नाव येणाऱ्या व्यक्तींसोबत काम करणार नाही, असे म्हटले आहे. पण या मोहिमेबद्दल एक वेगळेच मत शक्ती कपूर यांनी व्यक्त केले आहे. शक्ती कपूर आजवर बॉलिवूडमध्ये अनेक कॉमिक आणि खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. त्यांनी या मोहिमेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या सगळ्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे शक्ती कपूर यांचे म्हणणे आहे.
शक्ती कपूर यांनी या मोहिमेबद्दल असलेले आपले मत एका व्हिडीओ क्लिपद्वारे मांडले आहे. त्यांनी या क्लिपमध्ये म्हटले आहे की, सध्या मीटू या मोहिमेद्वारे अनेक क्षेत्रातील लोकांकडे बोट दाखवले जात आहेत. पण अशा प्रकरणामध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली केवळ ब्लॅकमेल करत असल्याचे मला वाटते. त्यामुळे कोर्टात जोपर्यंत व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत व्यक्तीचे नाव जाहीर केले जाऊ नये. नावे जाहीर केली जात असल्याने त्या व्यक्तीची प्रचंड बदनामी होत आहे. आरोपांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. बाहेरचे लोक काय पण कुटुंबातील लोक देखील त्यांच्याकडे संशयाने पाहायला लागले आहेत.
काहींना यामुळे आपलं काम, नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष देऊन याबाबत कायदा बनवावा. आतापर्यंत साजिद खान, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन यांच्यावर आरोप झाले आहेत. साजिदला यामुळे चित्रपट देखील गमवावा लागला. उद्या मोदीसाहेब तुमच्यावर आरोप झाल्यास तुम्ही काय करणार, असा थेट प्रश्न शक्ती कपूर यांनी क्लिपद्वारे विचारला आहे.