"शाहरुख खान हा खलनायक होता..."; DDLJ मधील अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:46 IST2025-10-28T11:43:57+5:302025-10-28T11:46:28+5:30
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमातील एका अभिनेत्याने शाहरुखच्या राज या पात्राला खलनायक ठरवलं आहे. जाणून घ्या

"शाहरुख खान हा खलनायक होता..."; DDLJ मधील अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला?
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला आणि आजही लोकांच्या मनात घर करून राहिलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (DDLJ) हा चित्रपट रोमँटिक चित्रपटांसाठी बेंचमार्क म्हणून ओळखला जातो. मात्र या चित्रपटातील 'राज' आणि 'सिमरन' यांच्या प्रेम कहाणीवर, चित्रपटातील एका कलाकारानेच आक्षेप घेतला आहे. याशिवाय DDLJ मध्ये शाहरुख खान खलनायक होता, असं विधान केलंय.
अभिनेत्री अर्चना पूरण सिंगचा नवरा आणि अभिनेता परमीत सेठी यांनी या DDLJ चित्रपटात सिमरनचा होणारा नवरा कुलजीतची भूमिका साकारली होती. पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत परमीत सेठी यांनी स्पष्ट केलं की, 'डीडीएलजे'मध्ये त्यांनी साकारलेली 'कुलजीत'ची भूमिका खलनायकी नव्हती. त्यांचं मत आहे की, चित्रपटात खरा खलनायक शाहरुख खानने साकारलेलं 'राज' हे पात्र होतं.
परमीत सेठी म्हणाले, "चित्रपटात माझ्या 'कुलजीत' या पात्राने काहीही चुकीचे केलं नाही. सिनेमात राज येतो आणि माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन जातो. त्यामुळे खरा खलनायक हा राज होता." परमीत सेठी यांच्या या मताला सोशल मीडिया युजर्सनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. एका युजरने म्हटलं की, "शाहरुख खानचे पात्र अनेकदा दुसऱ्याच्या गर्लफ्रेंड, होणाऱ्या बायकोला किंवा पत्नीला आपल्या जाळ्यात ओढून घेऊन जाते. शेवटी शाहरुखला हिरोईन मिळतेच."
या संदर्भात मनोज वाजपेयी यांचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यात ते सांगतात की 'वीर जारा'मध्ये सुद्धा शाहरुख खानचे पात्र त्यांच्या होणाऱ्या बायकोला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो, पण प्रेक्षक मात्र मनोजच्या पात्राचा तिरस्कार करतात. परमीत सेठी यांच्या या वक्तव्यामुळे 'डीडीएलजे' चित्रपटाच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे