Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 09:46 IST2025-11-03T09:45:02+5:302025-11-03T09:46:57+5:30
शाहरुख खान आधी चाहत्यांना भेटणार नव्हता असं ठरलं होतं. त्याने स्वतः तसं सांगितलं होतं. परंतु तरीही रात्री उशीरा तो सर्वांना भेटायला आला. पुढे काय घडलं?

Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या ६० व्या वाढदिवशी मोठा गोंधळ झाला. शाहरुखने आधीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितल होतं की, तो यंदा 'मन्नत' या त्याच्या बंगल्याबाहेर येऊन त्यांची भेट घेऊ शकणार नाही. मात्र, या घोषणेनंतरही चाहत्यांनी त्याला भेटण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मन्नतबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे शाहरुखलाही चाहत्यांना भेटण्याचा मोह आवरला नाही. परंतु त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जाणून घ्या
शाहरुख चाहत्यांना भेटायला आला, पण...
रात्री उशिरा एका खाजगी वाढदिवस कार्यक्रमातून परतत असताना, चाहत्यांच्या मोठ्या जमावाला शाहरुख खानची झलक दिसली. बाहेर असंख्य संख्येने चाहते ताटकळत उभं असल्याचं पाहून शाहरुख त्यांना भेटायला आला. परंतु किंग खानला पाहताच अचानक लोकांचा मोठा जमव त्याच्या दिशेने धावत आला. त्यामुळे पोलिसांनी लगेच शाहरुखला दूर केलं. शाहरुख जास्त वेळ तिथे थांबला असता तर चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाली असती. त्यामुळे शाहरुखनेही प्रसंगावधान राखत तिथून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी जमावाला बाजूला सारून शाहरुखला त्याच्या चाहत्यांच्या गर्दीतून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि पुढील कोणत्याही अनुचित प्रकारापासून त्याचा बचाव केला. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. शाहरुखने चाहत्यांना मन्नतवर भेटणार नसल्याचं सांगितल्यानंतरही, चाहते त्याची वाट बघत उभे होते. पुढे काही मोजक्या चाहत्यांसोबत शाहरुखने बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिरात ६० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. शाहरुखने त्याच्या वाढदिवशी त्याच्या आगामी 'किंग' सिनेमाचा खास टीझर सर्वांसमोर आणला.