"कोविड काळात मी कुटुंबासोबत होतो तेव्हा...", शाहरुख खानला वाटतो मुलांचा अभिमान, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:52 IST2026-02-17T09:51:32+5:302026-02-17T09:52:08+5:30
४ वर्ष स्क्रीनवरुन गायब होता शाहरुख खान, म्हणाला...

"कोविड काळात मी कुटुंबासोबत होतो तेव्हा...", शाहरुख खानला वाटतो मुलांचा अभिमान, म्हणाला...
बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान अनेक दशकांपासून सिनेसृष्टीवर राज्य करत आहे. सुरुवातीला चॉकलेट बॉय नंतर रोमँटिक हिरो आणि आता अॅक्शन हिरो अशी त्याची ओळख बनली आहे. मधल्या काळात शाहरुखच्या कुटुंबावर संकट आलं होतं. त्याचा लेक आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अटकेत होता. शाहरुखही चार वर्ष स्क्रीनवरुन गायब होता. मात्र सर्व संकटांना शांतपणे तोंड देत २०२३ साली शाहरुखने दमदार कमबॅक केलं. एकाच वर्षात त्याने लागोपाठ तीन ब्लॉकबस्टर हिट सिनेमे दिले. आयुष्य फक्त प्रसिद्धी आणि यशापुरतं मर्यादित नाही हे आपण मुलांकडून शिकल्याचं तो एका मुलाखतीत म्हणाला.
शाहरुख खानचा 'झीरो' सिनेमा सुपरफ्लॉप झाला होता. नंतर तो ४ वर्ष सिनेसृष्टीतून गायबच होता. याबद्दल तो म्हणाला, "जेव्हा जगभरातील लोक कोविड १९ वेळी आपल्या कुटुंबात परत आले तेव्हा मी सुद्धा माझ्या कुटुंबाजवळ परतलो. मी नेहमीच माझ्या मुलांजवळ होतो, कधीच त्यांच्यापासून दूर नव्हतो. पण कोविड काळात त्यांच्यासोबत इतका वेळ घालवल्यानंतर मला कुटुंबाची किंमत समजली. माझ्या व्यग्र शेड्युलमध्येही जमिनीशी जोडलेला राहण्यासाठी कुटुंबानेच माझी मदत केली. माझी मुलं माझे सर्वात मोठे टीकाकार, समीक्षक आहेत. कुटुंब माझं मार्गदर्शक आहे जे मला कायम त्यांच्याशी जोडून ठेवतं. आयुष्यात महत्वाचं काय हे शिकवतं."
तो पुढे म्हणाला, "वारसा हा फक्त प्रोफेशनल यशाचा नसतो तर कुटुंबासोबत घालवलेल्या आठवणींचाही असतो. प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखण्यावर ते अवलंबून आहे. जेव्हा मी जिद्दीन काम करत असतो तेव्हा मी वडील असल्याचं कर्तव्य विसरत नाही. मला माझ्या मुलांचा अभिमान वाटतो. ते त्यांचा मार्ग निवडत आहेत आणि कलाकार म्हणून ओळखही बनवत आहेत हे पाहून मला आनंद होतो. त्यांच्यासोबत व्हॉइसओवर करणं हा माझ्यासाठी सर्वात खास अनुभव होता. मी त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या पण त्यांच्या वैचारिक बुद्धीने मलाही खूप काही शिकवलं. त्यांना नवीन गोष्टी शिकताना पाहून आणि आत्मविश्वासाने स्वत:ला ते दाखवताना पाहून मला खूप छान वाटलं. आम्हाला एकत्र छान क्षण घालवण्याची संधी मिळाली."