शाहरूख खानने राकेश शर्मा बायोपिकमधून घेतला काढता पाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 06:00 IST2019-01-15T06:00:00+5:302019-01-15T06:00:00+5:30
राकेश शर्मा यांच्या भूमिकेमध्ये शाहरुख दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता शाहरुखने अचानकपणे या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे.

शाहरूख खानने राकेश शर्मा बायोपिकमधून घेतला काढता पाय
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकची चर्चा सुरू आहे. राकेश शर्मा यांच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील बऱ्याच नायकांची नावे चर्चेत होती. यात यादीत आमीर खानच्या नावाचा देखील समावेश होता. मात्र आमीरने या चित्रपटासाठी शाहरुख खानचे नाव दिग्दर्शकाला सुचविले होते. त्यामुळे आमीरऐवजी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे नाव जवळजवळ निश्चित झाले होते. त्यामुळे राकेश शर्मा यांच्या भूमिकेमध्ये शाहरुख दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता शाहरुखने अचानकपणे या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे.
राकेश शर्मा यांच्या भूमिकेला शाहरुख खान न्याय देऊ शकतो असा विश्वास दाखवून मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने या चित्रपटासाठी शाहरुखचे नाव सुचवले होते. मात्र आता शाहरुखने चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. फरहान अख्तरचा आगामी डॉन ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळेच शाहरुखने राकेश शर्माच्या बायोपिकसाठी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
राकेश शर्मा यांच्या भूमिकेत कोणत्या कलाकाराची वर्णी लागेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झालेत. या चित्रपटाची निर्मिती आरकेएफ प्रोडक्शन करणार आहे. हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकर आणि फातिमा सना शेख या तिघींच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.