Cruise Drugs Case: आर्यन खानमुळे शाहरुखच्या डुप्लिकेटवर आली उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 13:33 IST2021-10-12T13:33:38+5:302021-10-12T13:33:46+5:30
Cruise Drugs Case: अनेक मोठ्या ब्रँडने शाहरूखसोबतचा कॉन्ट्रॅक्ट तोडले आहेत. इतकंच नाही तर शाहरुखप्रमाणे त्याच्या डुप्लिकेटलाही या प्रकरणाची झळ बसली आहे.

Cruise Drugs Case: आर्यन खानमुळे शाहरुखच्या डुप्लिकेटवर आली उपासमारीची वेळ
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)लेक आर्यन खान (Aryan Khan) सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहे. शुक्रवारपासून तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर बुधवारी दुपारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांना तुरुंगात रहावं लागणार आहे. ड्रग्स प्रकरणी आर्यनचं नाव समोर आल्यानंतर कलाविश्वात प्रचंड गोंधळ उडाला असून त्याचा परिणाम शाहरुखच्या करिअरवरदेखील झाल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही. तर, आर्यनच्या पार्टीचा फटका शाहरुखच्या डुप्लिकेटलाही बसला आहे. त्याच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
आर्यन खानच्या अटकेचा फटका शाहरुखच्या व्यावसायिक करिअरवर बसत आहे. अनेक मोठ्या ब्रँडने शाहरूखसोबतचा कॉन्ट्रॅक्ट तोडले आहेत. इतकंच नाही तर शाहरुखप्रमाणे त्याच्या डुप्लिकेटलाही या प्रकरणाची झळ बसली आहे. अलिकडेच शाहरुखचा डुप्लिकेट राजू रहिकवारने (Raju Rahikwar) एका मुलाखतीत त्याच्यावर ओढावलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं.
Cruise Drugs Case: आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला नेमकं कुठे ठेवलंय?
"जवळपास दीड वर्षांपासून माझ्या हातात काम नाहीये. कोरोनामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन झालेलं नाही. कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर पुन्हा विस्कटलेली घडी नीट बसेल अशी आशा होती.१० ऑक्टोबर रोजी जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं मला आमंत्रणही देण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर याच शहरात आणखी एका कार्यक्रमात मी सहभागी होणार होतो. परंतु, हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले", असं राजू म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "सध्या नागरिकांमध्ये शाहरुखची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे दररोज याच चर्चा रंगत आहेत. म्हणूनच सध्या या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला आमंत्रित करता येणार नाही असं मला सांगण्यात आलं. सध्याच्या काळात शाहरुख खानच्या मनाची स्थिती काय असेल याची मी कल्पना करु शकतो.पण, या अनुभवानंतर शाहरुख आणखी स्ट्राँग होऊन बाहेर येतील याची मला आशा आहे."
दरम्यान, ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट या दोघांनाही आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आलं आहे. या दोघांचीही RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना स्पेशल क्वारंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आर्यन आणि अरबाजला ठेवण्यात आलेल्या बॅरेक क्रमांक १मध्ये केवळ एकच पंखा असून या दोघांनाही एकच अंथरुण-पांघरुण देण्यात आलं आहे. सोबतच अन्य कैद्यांप्रमाणे रोजच्या जेवणात त्यांना वरण-भात, भाजी-पोळी हेच पदार्थ देण्यात येतात.