शाहरुख खान झळकणार मार्वेल प्रोडक्शनच्या चित्रपटात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 13:59 IST2018-09-15T13:58:42+5:302018-09-15T13:59:51+5:30
मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान झळकणार असल्याची चर्चा आहे. भारतीय संस्कृतीशी निगडित चित्रपट मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सला बनवायचा असून त्यात शाहरुख खानने मुख्य भूमिकेत झळकावी अशी त्यांची इच्छा असल्याचे म्हटले जात आहे.

शाहरुख खान झळकणार मार्वेल प्रोडक्शनच्या चित्रपटात?
मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सने आजवर अनेक हिट हॉलिवूडचे चित्रपट दिले आहेत. त्यांचे चित्रपट, त्यातील व्यक्तिरेखा या नेहमीच प्रेक्षकांना भावतात. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅव्हेंजर - इन्फिनिटी वॉर, ब्लॅक पॅन्थर यांसारख्या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. आता मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान झळकणार असल्याची चर्चा आहे. भारतीय संस्कृतीशी निगडित चित्रपट मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सला बनवायचा असून त्यात शाहरुख खानने मुख्य भूमिकेत झळकावी अशी त्यांची इच्छा असल्याचे म्हटले जात आहे.
मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे क्रिएटिव्ह डेव्हलपमेंटचे स्टिफन वॉकर यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेतील मार्वेलचे फॅन असलेल्या लोकांसमोर भारतीय संस्कृती चित्रपटाद्वारे मांडण्याचा आमचा मानस आहे. आमच्या कंपनीसाठी हे खूप रंजक असणार आहे. भारतीय मुलांना आमच्या कंपनीशी जोडण्याचा आमचा हा प्रयत्न असेल. आम्ही भविष्यात भारतीय संस्कृतीशी निगडित कोणता चित्रपट केल्यास शाहरुख खाननेच त्यात काम करावे अशी आमची इच्छा आहे.
त्यामुळे भविष्यात मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटात शाहरुख खान झळकू शकतो असे म्हटले जात आहे. शाहरुख गेली अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य करत आहे. त्याने फौजी, सर्कस यांसारख्या मालिकांपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. छोट्या पडद्यावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळेच त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याने आजवर कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, चक दे इंडिया, स्वदेश यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुखचा आगामी चित्रपट झिरो असून सध्या या चित्रपटाची जोरदार तयारी तो करत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ त्याच्या नायिकेच्या भूमिकेत असून एक वेगळा शाहरुख खान प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
कसौटी जिंदगी की या कार्यक्रमाद्वारे तो कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी त्याने नुकतेच चित्रीकरण केले असून या प्रोमोत तो सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे.