सेजल शर्माच्या आत्महत्येमुळे टिव्ही जगताला बसला धक्का, आमिरसोबत या प्रोजेक्टसाठी केले होते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 16:49 IST2020-01-25T16:47:28+5:302020-01-25T16:49:04+5:30
सेजलने एका प्रोजेक्टसाठी आमिर खानसोबत काम केले होते. तिच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

सेजल शर्माच्या आत्महत्येमुळे टिव्ही जगताला बसला धक्का, आमिरसोबत या प्रोजेक्टसाठी केले होते काम
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माने तिच्या राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सेजल मीरा रोड येथे तिच्या दोन रूम मेट सोबत राहात होती.
काशमिरा पोलिस स्थानकात सेजलच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिच्या खोलीत राहाणाऱ्या दोन मुलींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पाच वाजता पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सेजलला पाहाण्यात आले. सेजलच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट सापडली असून तिने यात आत्महत्येमागचे कारण लिहिले आहे. तिच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरविले जाऊ नये असे तिने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. सेजल ही केवळ 26 वर्षांची होती. तिने स्टार प्लसवरील दिल तो हॅपी है जी या मालिकेत काम केले होते.
एवढेच नव्हे तर सेजलने एका प्रोजेक्टसाठी आमिर खानसोबत काम केले होते. आमिर खानसोबत व्हिवो या मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत ती झळकली होती. आमिरसोबत काम करायला मिळाल्यामुळे सेजलला प्रचंड आनंद झाला होता. तिने आमिर सोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ती खूप खूश असल्याचे सगळ्यांना सांगितले होते.
मीरा रोड येथील शिवार गार्डन परिसरातील रॉयल नेस्ट हाऊसिंग सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर गेल्या काही महिन्यांपासून सेजल भाड्यावर राहात होती. दिल तो हॅपी है जी ही तिची मालिका जानेवारी 2019 ला सुरू झाली होती. पण अचानक ऑगस्टला ही मालिका बंद करण्यात आली. या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. तिच्या काही मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, मालिका बंद झाल्यानंतर सेजल प्रचंड तणावाखाली होती. ती गेल्या काही महिन्यांपासून काम शोधत होती. पण काही केल्या तिला काम मिळत नसल्याने ती निराश झाली होती.
सेजल ही मुळजी राजस्थानमधील उदयपूर येथील होती. अभिनयक्षेत्रात करियर करण्यासाठी 2017 मध्ये ती मुंबईत आली होती. दिल तो हॅपी है जी ही तिची पहिलीच मालिका होती. याआधी तिने काही जाहिरातींमध्ये काम केले होते.