ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 09:17 IST2025-11-14T09:17:10+5:302025-11-14T09:17:38+5:30
Actor Dharmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या उपचारादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याने गुपचूप बनवून अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांचे कुटुंब खूप भावनिक झालेले दिसत होते. आता लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, त्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या आजूबाजूला दिसत होते. त्यांची पत्नी प्रकाश कौर रडून रडून बेहाल झाल्या होत्या आणि सनी देओल त्यांना सावरत होते. कुटुंबाच्या या अत्यंत खासगी आणि भावनिक क्षणाचे फुटेज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने गुपचूप रेकॉर्ड केले होते. आता माहिती समोर येत आहे की व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाचा चोरून व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या आरोपाखाली एका हॉस्पिटल कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. हा व्हिडीओ १३ नोव्हेंबर रोजी, म्हणजेच अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
धर्मेंद्र आणि कुटुंबाचा गुपचूप बनवलेला व्हिडीओ
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र बेडवर दिसले, तर त्यांचे पुत्र बॉबी देओल, सनी देओल आणि मुली अजीता व विजेता व कुटुंबातील इतर सदस्य जवळ उभे होते. सर्वजण दुःखी होते, आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सनीची मुलं करण आणि राजवीर देखील तिथे होते. क्लिपमध्ये धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर जोरजोरात रडताना दिसल्या. हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे की गुपचूप व्हिडिओ बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अफवा पसरवल्याने भडकल्या होत्या हेमा आणि ईशा
श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान शाहरुख खान, सलमान खानपासून ते गोविंदापर्यंत अनेकजण त्यांना भेटायला आले होते. पण दोन दिवसांनीच अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यात आला. सनी देओलच्या टीमने सांगितले की, आता त्यांच्यावर घरीच उपचार होतील. या काळात अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले गेले, ज्यामुळे हेमा मालिनी आणि ईशा देओल भडकल्या होत्या.
हेमा म्हणाल्या...
हेमा मालिनी यांनी सुभाष के. झा यांच्याशी या कठीण वेळेबद्दल बोलताना सांगितले होते की, त्यांची मुले रात्रभर झोपू शकली नाहीत. त्यामुळे त्या कमकुवत पडू शकत नाहीत, कारण त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. ते घरी परतल्यामुळे अभिनेत्री आनंदी आहेत, कारण त्यांना आपल्या लोकांमध्ये राहण्याची गरज आहे. त्या म्हणाल्या, 'बाकी सर्व काही वरच्या देवाच्या हातात आहे.'