सतीश शाह यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; पंचतत्वात विलीन, इंडस्ट्रीतील दिग्गजांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:40 IST2025-10-26T16:37:23+5:302025-10-26T16:40:06+5:30
जवळपास चार दशक सतीश शाह यांनी हिंदी चित्रपट सृष्टी आणि टेलिव्हिजन जगतात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.

सतीश शाह यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; पंचतत्वात विलीन, इंडस्ट्रीतील दिग्गजांची उपस्थिती
हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना कायम हसवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते सतीश शाह यांचे शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी निधन झाले. त्यांचे पार्थिव आज मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत आणण्यात आले आणि दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते, ज्यांनी साश्रू नयनांनी या कलाकाराला अखेरचा निरोप दिला.
सतीश शाह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. यात नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, सुप्रिया पाठक, रत्ना पाठक शाह, डेव्हिड धवन, रूमी जाफरी, पूनम ढिल्लन, फराह खान, मधुर भांडारकर, सुरेश ओबेरॉय, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ यांचा समावेश होता. याशिवाय १९७० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायक रणजीत, टिकू तलसानिया आणि अवतार गिल यांसारखे त्यांचे जुने सहकारीही उपस्थित होते. साराभाई Vs साराभाई या टीव्ही शोमध्ये त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा रोशेशची भूमिका करणारा राजेश कुमारनं त्यांच्या पार्थवीला खांदा दिला.
मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन
७४ वर्षीय सतीश शाह यांच्या निधनाचे वृत्त हृदय पिळवटून टाकणारे आहे. सतीश यांना किडनीचा आजार होता. जूनमध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण झाल्याचे वृत्त होते आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती सुधारत होती. मात्र, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ते जेवताना अचानक कोसळले. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
'ये जो है जिंदगी' ते २५० चित्रपट
सतीश शाह यांनी १९७८ मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र, टेलिव्हिजनवरील "ये जो है जिंदगी" या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सतीश शाह यांनी जवळपास २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे", "हम आपके हैं कौन", "अर्ध सत्य", "जाने भी दो यारों", "मुझसे शादी करोगे", "बेनाम बादशाह" आणि "जुडवा" यांसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे हे अमूल्य योगदान सदैव लक्षात ठेवले जाईल.