Video: सतीश शहांना 'साराभाई वर्सेस साराभाई'च्या कलाकारांनी गाणं गात दिला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:47 IST2025-10-27T15:06:28+5:302025-10-27T15:47:39+5:30
ज्या गाण्याने अनेक वर्षे प्रेक्षकांना हसवलं आणि आनंद दिला, तेच गाणं एका अत्यंत भावूक वातावरणात गायलं गेलं.

Video: सतीश शहांना 'साराभाई वर्सेस साराभाई'च्या कलाकारांनी गाणं गात दिला अखेरचा निरोप
प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून किडनीच्या गंभीर समस्यांपासून त्रस्त होते. त्यांच्या अभिनयाने त्यांनी अनेकांची मने जिंकली. हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'हम साथ साथ है', 'मै हूँ ना' या चित्रपटांसह ते टीव्हीवरील 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेत दिसले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती, पण त्यांच्या 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेतील कलाकारांनी दिलेला निरोप पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
'साराभाई व्हर्सेस साराभाई' या लोकप्रिय मालिकेत 'इंद्रवदन साराभाई' हे अविस्मरणीय पात्र साकारणारे सतीश शाह हे त्यांच्या सहकलाकारांसाठी फक्त एक 'को-स्टार' नव्हते. 'साराभाई' कुटुंबाचे हे नाते केवळ मालिकेपर्यंत मर्यादित नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने एक कुटुंब होते. पडद्यावर आणि पडद्यामागेही हे कलाकार एकमेकांशी घट्ट जोडलेले होते. सतीश शाह यांच्या अंत्यसंस्कारावेळी 'साराभाई' मालिकेतील मुख्य कलाकार रूपाली गांगुली, सुमीत राघवन, राजेश कुमार, निर्माते जेडी मजेठिया आणि दिग्दर्शक देवेन भोजानी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
या संपूर्ण टीमने आपल्या लाडक्या 'इंद्रवदन'ला निरोप दिला. त्यांनी सतीश शाह यांच्या पार्थिवाजवळ उभे राहून मालिकेचे टायटल साँग एकत्र गायले. ज्या गाण्याने अनेक वर्षे प्रेक्षकांना हसवलं आणि आनंद दिला, तेच गाणं एका अत्यंत भावूक वातावरणात गायलं गेलं. दिग्दर्शक देवेन भोजानी यांनी या भावनिक क्षणाबद्दल बोलताना सांगितले, "हे थोडं विचित्र किंवा वेडगळ वाटू शकतं, पण आम्ही सगळे एकत्र येतो तेव्हा हे गाणं नेहमीच गातो आणि आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. आम्हाला असे वाटले, की जणू 'इंदू'ने स्वतःच गाण्याचा आग्रह केला आणि तो आमच्यात सामील झाला". या भावनिक निरोपाच्या वेळी 'मोनिशा साराभाई'ची भूमिका साकारणाऱ्या रूपाली गांगुलीला आपले अश्रू अनावर झाले. ती धाय मोकलून रडताना दिसली.