भारतात 'बॅन' झालेला ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट 'संतोष' आता ओटीटीवर; कुठे पाहता येईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:42 IST2025-10-08T09:39:38+5:302025-10-08T09:42:06+5:30
'संतोष' या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड प्रशंसा मिळाली आहे.

भारतात 'बॅन' झालेला ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट 'संतोष' आता ओटीटीवर; कुठे पाहता येईल!
Santosh Ott Release Date: आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड प्रशंसा मिळवलेला, पण सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने भारतात प्रदर्शनावर बंदी घातलेला चित्रपट 'संतोष' (Santosh) अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अनेक दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. मात्र आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत असल्याने भारतीय प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'संतोष' चित्रपट १७ ऑक्टोबर रोजी लायन्सगेट प्ले (Lionsgate Play) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतात डिजिटल पदार्पण करणार आहे. संध्या सुरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका अभिनेत्री शहाना गोस्वामी यांनी साकारली आहे, तर सुनीता राजवार यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री शहाना गोस्वामी म्हणाली, "ही समाजाचा आरसा दाखवणारी चित्रपटाची कथा आहे. संध्या सुरीने खरोखरच एक अद्भुत चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट आता भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याचा मला आनंद आहे". हा चित्रपट मूळतः १० जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर बोर्डाने त्याला मान्यता न दिल्याने त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. युकेतर्फे मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी 'संतोष'ची निवड करण्यात आली होती.
UK ने 'संतोष'ची निवड का केली?
UKने 'संतोष' चित्रपट ऑस्करसाठी पाठवला. कारण, तो तेथे प्रदर्शित झाला आणि त्यात ब्रिटिश निर्मात्यांचा हात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अन सरटेन रिगार्ड विभागात 'संतोष' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होता. या चित्रपटात उत्तर भारतातील एका विधवा महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. जी पतीच्या मृत्यूनंतर आश्रित कोट्यातून हवालदार बनते. एका तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करते. यानंतर मग तिच्या आयुष्याला घडणाऱ्या घटना या चित्रपटात पाहायला मिळतात.