Sanjeev Kumar Birthday Special : संजीव कुमार यांच्यामुळे या अभिनेत्रीने आयुष्यभर केले नाही लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:06 IST2019-07-09T19:05:10+5:302019-07-09T19:06:45+5:30
संजीव कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने आयुष्यभर लग्न केले नाही. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

Sanjeev Kumar Birthday Special : संजीव कुमार यांच्यामुळे या अभिनेत्रीने आयुष्यभर केले नाही लग्न
हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार संजीव कुमार आज आपल्यात नाहीत. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आजच्याच दिवशी म्हणजे ९ जुलै १९३८ ला त्यांचा जन्म झाला होता. संजीव कुमार यांचे खरे नाव हरीभाई जरीवाला होते. ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटात त्यांनी नऊ भूमिका साकारल्या होत्या. ‘कोशिश’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली मूक आणि कर्ण बधीर व्यक्तीची भूमिकाही गाजली होती.
संजीव कुमार अनेकदा प्रेमात पडले. पण त्यांनी कधीच लग्न केले नाही. सुलक्षणा पंडित या अभिनेत्रीने संजीव कुमार यांच्यामुळे आयुष्यभर लग्न केले नाही. सुलक्षणा पंडित यांनी अधिकाधिक चित्रपटांमध्ये संजीव कुमार यांच्यासोबतच काम केले. संजीव कुमार आज हयात नाहीत. पण एकेकाळी सुलक्षणा पंडित त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. संजीव कुमार यांनी नकार दिल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. ही गोष्ट सुलक्षणा यांची बहीण विजेता पंडित यांनीच स्वतः मीडियाला सांगितली होती. सुलक्षणा अनेक वर्षांपासून बिछान्याला खिळलेल्या असून त्या विजेतासोबतच राहातात.
विजेता यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सुलक्षणा दीदी दिवसातील अनेक तास तिच्या रूमममध्येच घालवते. संजीव कुमार यांनी प्रेमाचा स्वीकार न केल्याने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले आणि त्यात संजीव कुमार यांचा अतिशय कमी वयात मृत्यू झाल्याने तिचे मानसिक संतुलन अधिकच बिघडले. संजीव कुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षं दीदी एकटीच राहात होती. पण तिची तब्येत अधिक ढासळल्याने मी तिला घरी घेऊन आले. तेव्हापासून ती माझ्यासोबतच राहात आहे. काही वर्षांपूर्वी ती बाथरूममध्ये पडली होती आणि त्यामुळे तिच्या कंबरेला जबर मार बसला होता. तेव्हापासून तिला धड चालता देखील येत नाही. ती अथंरुणालाच खिळून आहे. तिला कोणालाही भेटायला आवडत नाही. तसेच ती कोणाशी जास्त बोलतदेखील नाही.
संजीव कुमार आणि सुलक्षणा पंडित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. उलझन या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सुलक्षणा संजीव कुमार यांच्या प्रेमात पडल्या. पण संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडत असल्याने त्यांनी सुलक्षणा यांना नकार दिला.