"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 11:27 IST2025-05-11T11:26:44+5:302025-05-11T11:27:13+5:30
सनम तेरी कसम या सुपरहिट सिनेमातल्या कलाकारांनी भारत-पाकिस्तान युद्धामुळे एकमेकांवर सडकून टीका केली. त्यामुळे दोघांमधली मैत्री तुटली, अशी चर्चा आहे

"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
सध्या भारत-पाकिस्तान देशामध्ये तणावाचं वातावरण आहे. या वातावरणात भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्ताननेही भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु भारताने तो हल्ला परतवून लावला. या सर्व परिस्थितीत एकेकाळी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेले पाकिस्तानी कलावंत भारताला दोष देऊन पाकिस्तानचं समर्थन करत आहेत. त्यामुळे या कलाकारांचे भारतीय फॅन्स नाराज झाले आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्याने यापुढे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम करणार नाही, अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्री चांगलीच दुखावली आहे.
हर्षवर्धन राणेचा मोठा निर्णय
'सनम तेरी कसम' या सुपरहिट सिनेमाचा हिरो हर्षवर्धन राणेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. यात त्याने मोठी घोषणा केली आहे. हर्षवर्धन लिहितो की, "सध्या आसपास जी परिस्थिती आहे आणि माझ्या देशाबद्दल ज्या प्रतिक्रिया मी वाचतोय त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे. जर सनम तेरी कसम २ मध्ये आधीचे कलाकार पुन्हा असतील तर या सिनेमात मी काम करण्यास नकार देईल." अशा स्पष्ट शब्दांमध्ये हर्षवर्धनने त्याची नाराजी प्रकट केली आहे. हर्षवर्धनची ही प्रतिक्रियेमुळे सनम तेरी कसममधील त्याची सहकलाकार अभिनेत्री मावरा होकेनला चांगलीच दुखावली गेली असं दिसतंय.
मावरा होकेन काय म्हणाली?
मावराने हर्षवर्धनच्या या स्टेटमेंटला PR स्ट्रॅटेजी म्हणत टीका केली आहे. मावरा म्हणते, "या प्रतिक्रियेला दुर्दैवी, दुःखद किंवा हास्यास्पद म्हणता येईल का? मला नाही माहित. ज्या व्यक्तीकडून मी कॉमन सेन्सची अपेक्षा केली होती तो झोपेतून उठून पीआर स्ट्रॅटेजी राबवतोय. आजूबाजूला काय होतंय हे बघा. आम्ही स्फोटांचे आवाज ऐकतोय, भ्याड हल्ल्यामुळे माझ्या देशातील मुलं मारली जात आहेत, निर्दोष माणसांचा मृत्यू झालाय."
अभिनेत्री मावरा पुढे लिहिते की, "आपल्या देशात युद्धासारखी परिस्थिती आहे आणि तुम्ही सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी एक PR स्टेटमेंट घेऊन आला आहात? किती दुःखद गोष्ट आहे. चित्रपटांवर चर्चा करण्याची, एकमेकांची चेष्टा करण्याची, एकमेकांना कमी लेखण्याची ही वेळ नाही. जर तुम्ही ९ वर्षांनंतर आदर न बाळगता माझे नाव वापरून बातम्यांमध्ये येत असाल, तर कदाचित तुम्ही चुकीच्या टीमने वेढलेले आहात. तुम्ही युद्धाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू नये, त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. माझा देश सर्वांपेक्षा वर आहे." अशाप्रकारे मावरा होकेनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'सनम तेरी कसम' सिनेमात हर्षवर्धन आणि मावरा प्रमुख भूमिकेत होते.