सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची अभिनय क्षेत्रात एंट्री, आहे कोट्यावधींचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:29 IST2025-08-02T17:28:57+5:302025-08-02T17:29:26+5:30
Salman Khan bodyguard's Shera : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड 'शेरा'ने आता अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. तो १९९५ सालापासून सलमानसोबत आहे.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची अभिनय क्षेत्रात एंट्री, आहे कोट्यावधींचा मालक
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)चा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड 'शेरा'(Shera)ने आता अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. तो १९९५ सालापासून सलमानसोबत आहे. तो नेहमीच पडद्यामागे सलमानसाठी सावलीसारखा उभा राहिला, पण तो कधीच पडद्यावर दिसला नाही. पण आता तो पडद्यावर दिसणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका दमदार शैलीत दिसत आहे.
शेराने एका जाहिरातीद्वारे अभिनयात पदार्पण केले आहे. हे येत्या रक्षाबंधन सणावर आधारीत आहे. जाहिरातीत त्याच्या दमदार उपस्थितीने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इन्स्टामार्टच्या नवीन रक्षाबंधन जाहिरातीत शेरा 'भावा'ची भूमिका साकारत आहे. या रक्षाबंधन मोहिमेत शेरा वेगवेगळ्या महिलांना मदत करताना दाखवण्यात आला आहे. तो पावसात एखाद्याला ऑटो मिळवून देण्यास मदत करत आहे, तर तो एखाद्याला त्रास देणाऱ्या वर्गमित्रापासून वाचवत आहे. जाहिरातीचा विषय असा आहे की शेरा हा सर्वांचा 'भाऊ' आहे आणि आता तुमच्या 'भावा'ला राखी पाठवून तुमचे कर्तव्य पार पाडण्याची पाळी आहे. त्याच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. काही नेटकरी म्हणत आहेत की त्याने चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावावे. अनेकांनी शेराची तुलना युवराज सिंग आणि मिकाशी केली.
३० वर्षांपासून आहे सलमानचा बॉडीगार्ड
शेरा, जो वर्षानुवर्षे सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेत आहे, त्याचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे का? लोक त्याला शेरा म्हणून ओळखतात पण त्याचे खरे नाव गुरमीत सिंग जॉली आहे. तो १९९५ पासून भाईजानसोबत आहे म्हणजेच शेरा गेल्या ३० वर्षांपासून सलमान खानचा पर्सनल अंगरक्षक आहे. तो 'टायगर सिक्युरिटी' ही एक सुरक्षा फर्म चालवतो ज्याने गेल्या काही वर्षांपासून अनेक सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवली आहे. २०१७ मध्ये मुंबईत झालेल्या जस्टिन बीबरच्या कॉन्सर्ट दरम्यान शेराने जस्टिन बीबरची सुरक्षा विशेषतः सांभाळली होती.
बॉडीबिल्डर म्हणून कारकिर्दीची सुरुवात
शेराने बॉडीबिल्डर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने १९८७ मध्ये मुंबई ज्युनियर बॉडीबिल्डिंगचा किताब जिंकला आणि १९८८ मध्ये मिस्टर महाराष्ट्र ज्युनियरचा उपविजेता होता. त्यानंतर तो बॉडीबिल्डरच्या क्षेत्रात उतरला आणि नंतर सलमान खानच्या टीमचा भाग बनला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेराची आजची एकूण संपत्ती सुमारे १०० कोटी रुपये आहे. सलमान त्याला दरमहा १५ लाख रुपये पगार देतो, जो दरवर्षी सुमारे २ कोटी रुपये होतो. त्याच्याकडे १.४० कोटी रुपयांच्या रेंज रोव्हरसह अनेक महागड्या गाड्या आहेत.