सलमान खानची पहिली जाहिरात पाहिली का? या जाहिरातीत त्याला ओळखणे देखील होतंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 14:55 IST2019-12-27T14:52:07+5:302019-12-27T14:55:21+5:30
सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी एका जाहिरातीत काम केले होते. या जाहिरातीत सलमान खान इतका वेगळा दिसतो की, त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे.

सलमान खानची पहिली जाहिरात पाहिली का? या जाहिरातीत त्याला ओळखणे देखील होतंय कठीण
सलमान खानचा आज वाढदिवस असून सलमानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्याची केवळ एक झलक पाहाण्यासाठी त्याचे फॅन्स कित्येक तास त्याच्या घराच्या समोर उभे असतात. सलमानने बिवी हो तो ऐसी या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तुम्हाला माहीत आहे का, त्याने या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी एका जाहिरातीत काम केले होते. या जाहिरातीत सलमान खान इतका वेगळा दिसतो की, त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे.
सलमानला त्याची ही पहिली जाहिरात कशी मिळाली होती. याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याने तारा शर्माला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी एकदा सी रॉक्स या हॉटेलच्या स्विमिंग पूलच्या जवळ बसलो होतो. त्याचवेळी मला लाल साडीत एक अतिशय सुंदर मुलगी दिसली. तिला इम्प्रेस करण्यासाठी मी काहीही विचार न करता स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि पूलाच्या चक्करा मारायला लागलो. पण मी बाहेर येऊन पाहिले तर ती मुलगी निघून गेली होती. मला त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी फोन आला की, एका जाहिरातीसाठी माझी निवड करण्यात आली आहे. ती जाहिरात कॅम्पा कोलाची होती. मला ही जाहिरात कशी मिळाली हेच मला कळत नव्हते.
त्याने या मुलाखतीत पुढे सांगितले होते की, फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची ती जाहिरात होती. त्यांना भेटायला सलमान त्यांच्या एका काकीसोबत गेला होता. तिथे गेल्यावर माझा नंबर कसा मिळाला असे सलमानने त्यांना विचारले होते. त्यावर त्याला कळले होते की, सलमान ज्या मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी दुसरी कोणीही नसून कैलास यांची गर्लफ्रेंड होती. या जाहिरातीत काम करणाऱ्या कलाकाराला खूपच चांगल्याप्रकारे स्विमिंग करता येणे गरजेचे होते. त्याचमुळे सलमानचे स्विमिंग पाहून कैलास यांच्या गर्लफ्रेंडने त्याचे नाव सुचवले होते.
सलमानच्या या जाहिरातीचे चित्रीकरण मालदीवमध्ये झाले होते. या जाहिरातीत सलमान आपल्याला अंडर वॉटर स्विमिंग करताना दिसला होता.