"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 09:19 IST2025-09-28T09:18:34+5:302025-09-28T09:19:06+5:30
सलमानने अभिनव कश्यपचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यालाच टोमणा मारला आहे.

"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
'दबंग' सिनेमाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने काही दिवसांपूर्वी सलमान खानवर अनेक आरोप केले होते. सलमान गुंड आहे असं तो म्हणाला होता. तसंच त्याच्या कुटुंबाबद्दलही टिप्पणी केली होती. सलमाननेच आपलं करिअर खराब केल्याचाही आरोप त्याने लावला. आता या सगळ्या आरोपांवर सलमानने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनवचं नाव न घेता त्याने अप्रत्यक्षरित्या सडेतोड उत्तर दिलं आहे.
सलमान खान सध्या 'बिग बॉस १९'चं सूत्रसंचालन करत आहे. काल झालेल्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमानने तान्या मित्तलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तान्या इच्छा व्यक्त करत म्हणाली की मुंबईत सलमान खानने आपल्या कुटुंबासारखंच होऊन जावं जेणेकरुन आपल्याला या शहरात सुरक्षित वाटेल. यानंतर सलमान सदस्यांशी चर्चा करताना म्हणाला, 'जे लोक माझ्याशी जोडले गेले आहेत किंवा होते आजकाल ते सगळेच काही ना काही अडचणीत आहेत. मी ज्यांना ओळखतो आणि ज्यांनी एकेकाळी माझं कौतुक केलं ते लोक आज उठसूट माझ्याबद्दल काहीही बरळत आहेत. आता त्यांना मी अजिबात आवडत नाही. आजकाल लोक पॉडकास्टमध्येही येऊन काहीही बोलत सुटतात कारण त्यांच्याकडे काहीच काम नसतं. माझी तुम्हा सगळ्यांनाही विनंती आहे की कृपया काहीतरी काम करा."
सलमानने अभिनव कश्यपचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यालाच टोमणा मारला आहे. तसंच घरातील सदस्यांनाही कामावर लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. सलमान सध्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं शूटिंग करत आहे. नुकताच तो ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या नव्या 'टू मच'शोमध्ये आला होता. त्याच्यासोबत आमिर खानही होता. शोमध्ये सलमानने प्रकट केलेल्या विचारांचं खूप कौतुक होत आहे.