२५ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करतेय भाईजानची ही हिरोईन, घरगुती हिंसेला पडली होती बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 13:34 IST2020-02-06T13:33:13+5:302020-02-06T13:34:22+5:30
या अभिनेत्रीला सलमाननेच जीवनदान दिले आहे.

२५ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करतेय भाईजानची ही हिरोईन, घरगुती हिंसेला पडली होती बळी
सलमान खानच्या वीरगती चित्रपटामधून झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. ती 'शुक्राना' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहे. नुकतेच तिने या लघुपटासाठी फोटोशूट केले. या लघुपटाचे दिग्दर्शन व लेखन सुरिंदर सिंग करत आहे. घरगुती हिंसाचारासोबत खासगी जीवनातील अडचणींचा सामना करणाऱ्या पूजाला मरणाच्या दारातून सलमान खानने परत आणले आहे.
सलमान खानने त्यांची सामाजिक संस्था बीइंग ह्युमनच्या माध्यमातून पूजाची मदत केली होती. पूजाने सलमान व त्याच्या संस्थेचे आभार मानले आहेत.
आता पूजा पुन्हा एकदा सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. याबाबत तिने सांगितले की, 'शुक्राना'चे दिग्दर्शक सुरिंदर सिंग यांनी माझा युट्युबवर व्हिडिओ पाहिला आणि मला या कथेसाठी विचारले. मी त्यांना व निर्माते विकास जॉली यांना भेटल्यानंतर या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी तयारी दर्शविली.
'शुक्राना'नंतर आता आम्ही एकत्र एक फिचर फिल्म करत आहोत. या चित्रपटाचं नाव असणार आहे 'ए ब्युटफुल वाईफ'. तिने पुढे सांगितले की, अभिनय माझं पहिलं प्रेम आहे आणि पुढेही मला अभिनय करत रहायचे आहे. मला वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. तिला निगेटिव्ह भूमिकादेखील साकारायची आहे.
पूजासोबत काम करण्याबाबत व 'शुक्राना'बद्दल निर्माते विकास जॉली यांनी सांगितले की, ''शुक्राना' देवाचे आभार मानण्याची एक पद्धत आहे. मला या चित्रपटाचा विषय व पूजाजी यांच्याबद्दल समजलं तर मी या प्रोजेक्टची निर्मिती करण्यासाठी तयार झालो. '
'शुक्राना'च्या शूटिंगला २१ फेब्रुवारीला सुरूवात होणार आहे. पूजा व शॉर्टफिल्मची संपूर्ण टीम अमृतसरमधील गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन आशीर्वाद घेऊन मग चित्रीकरणाला सुरूवात केली जाणार आहे.