सलमान खानमुळे मिळाले खान्देशच्या सहा महिन्याच्या चिमुकलीला जीवनदान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 16:16 IST2017-04-25T10:46:03+5:302017-04-25T16:16:03+5:30
-Ravindra More बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या ‘बिर्इंग ह्युमन’ या संस्थेकडून मिळालेल्या मदतीमुळे खान्देशातील एका सहा महिन्याची चिमुकलीची हृदयशस्त्रक्रिया यशस्वी ...
.jpg)
सलमान खानमुळे मिळाले खान्देशच्या सहा महिन्याच्या चिमुकलीला जीवनदान !
बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या ‘बिर्इंग ह्युमन’ या संस्थेकडून मिळालेल्या मदतीमुळे खान्देशातील एका सहा महिन्याची चिमुकलीची हृदयशस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याने तिला जीवनदान मिळाले.
खान्देशातील अमळनेर तालुक्यातील मुडी येथील सुर्यवंशी दांपत्याने आपल्या ‘ओवी’ या चिमुकल्या बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी शेतही गहाण ठेवले होते. मात्र सलमान खान याच्या दातृत्वामुळे ओवीचे प्राण तर वाचलेच मात्र तिच्या उपचारासाठी वडिलांनी गहाण ठेवलेल्या शेताची मालकी देखील कायम राहणार असल्याचा सुखद अनुभव सुर्यवंशी कुटुंबाला आला.
अभिनेता सलमान खान आपल्या अभिनयामुळे यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याचे यश दैदिप्यमान आहे. मात्र त्याच्या आयुष्यात अनेक वादळ आली. त्याला कोर्ट-कचेऱ्याचा सामनाही करावा लागला. ग्लॅमरच्या दुनियेत हा अभिनेता भरकटून गेला असा अनेकांचा समज आहे. असे असले तरी तो एक संवेदनशील मनाचा माणूस असल्याचा प्रत्यय तालुक्यातील मुडी येथील सूर्यवंशी कुटुंबाला आला आहे.
मुडी येथील ओवी सूर्यवंशी या बालिकेला जन्मानंतर काही दिवसात हृदयाचा आजार असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. सुरवातीला तिच्यावर अमळनेर येथील एका रूग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला उपचारासाठी मुंबई अथवा हैद्राबाद येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. तिच्यावरील शस्त्रक्रियेसाठी 6 लाख रुपए खर्च येणार होता. सूर्यवंशी परिवाराची परिस्थिती साधारण असल्याने, एवढा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. या परिवाराने शेतगहाण ठेवण्याची तयारी केली होती. मात्र तेवढ्या पैशाने आॅपरेशनचा खर्च पूर्ण होणार नव्हता. त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित शेत विकायला काढलं. सूर्यवंशी परिवाराने चार लाख रुपये जमवले. मात्र उर्वरित अडीच लाख रुपये जमवणे अवघड जात होते. त्यातच अभिनेता सलमान खान अशा रुग्णांना मदत करतो, त्याची एक संस्था आहे, असे मित्रांनी ‘ओवी’चे काका कमलेश सूर्यवंशी यांना सांगितले. कमलेश सूर्यवंशी यांनी मुंबई गाठली. सलमान खानच्या ‘बिईंग ह्युमन’ या संस्थेचे कार्यालय गाठलं. तिथे सलमानची बहिण अर्पिता यांनी ‘ओवी’ च्या उपचारा संबंधी सर्व माहिती जाणून घेतली. तसेच डॉक्टरांचे रिपोर्ट पाहत, मदतीचा होकार दिला. त्यामुळे 27 मार्च रोजी ‘ओवी’ ला मुलुंड येथील फोर्टिज हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. सलमानच्या संस्थेच्या मदतीने ‘ओवी’ चे आॅपरेशन झाले.
सलमान खान 2 एप्रिल रोजी दुपारी अचानक या 6 महिन्याच्या चिमुकलीला भेटण्यासाठी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याने ‘ओवी’चा गोड पापाही घेतला. सूर्यवंशी कुटुंबाची विचारपूस केली. सोबत कोण आहे, असं विचारले. इतर खर्च कसा काय केला? अस पालकांना विचारल. तेव्हा शेत गहाण ठेवल असे ओवीच्या काकांनी सांगितले. शेवटी 6 महिन्याच्या ओवीला बाय करून सलमान, तेथून निघून गेला. डिस्चाजर्च्या दिवशी मात्र सलमान खान याने मदत केल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून माहित झाले. सलमान खान याने केलेल्या आर्थिक सहाय्यामुळे ‘ओवी’ या चिमुकलीचे प्राण वाचले. त्यामुळे सूर्यवंशी परिवार सलमान खानचे उपकार विसरू शकत नाही. सलमानच्या दातृत्त्वामुळे आमची मुलगी जीवंत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. ओवीला आरोग्य तर मिळालच पण तिच्या उज्वल भविष्यासाठी ओवीच्या वडीलांचा शेतही वाचलं.