पंकज त्रिपाठीच्या 'कागझ' सिनेमातील कवितेला सलमान खानने दिला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 21:12 IST2021-01-07T21:12:21+5:302021-01-07T21:12:56+5:30
अभिनेता पंकज त्रिपाठीचा कागझ चित्रपट नुकताच झी ५वर रिलीज झाला आहे.

पंकज त्रिपाठीच्या 'कागझ' सिनेमातील कवितेला सलमान खानने दिला आवाज
मिर्झापूर फेम अभिनेता पंकज त्रिपाठीचा कागझ चित्रपट नुकताच झी ५वर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले असून या चित्रपटातील कवितेला सलमान खानने आवाज दिला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी सलमान खानने या चित्रपटासाठी एक कविता वाचली असल्याची माहिती या चित्रपटाविषयी बोलताना दिली. कौशिक म्हणाले की, "तरुण कवी अझीम अहमद अब्बासी यांनी लिहिलेल्या कवितेला आम्ही चित्रपटात वापरले आहे. या संपूर्ण चित्रपटाचा आशय या कवितेत एकवटला असून आपल्या खास अंदाजात सलमान खान याने ती वाचली आहे." चित्रपटात सुरूवातीला आणि शेवटी येणाऱ्या या कवितेला सलमान खान याच्या आवाजाने एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे कौशिक म्हणाले.
‘कागझ’ सलमान खान फिल्म्स आणि सतीश कौशिक प्रोडक्शन्स यांची निर्मिती असून दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर आणि अमर उपाध्याय यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
पंकज त्रिपाठीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याची न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमातील भूमिका लोकांना खूप भावली होती. नुकतीच पंकजची लोकप्रिय वेबसीरिज मिर्झापूरमध्ये २ रिलीज झाली. यातील त्याने साकारलेली कालीन भय्याची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.
त्यानंतर आता तो १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.