Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:01 IST2025-12-28T11:00:46+5:302025-12-28T11:01:20+5:30
सुरक्षेच्या कारणामुळे सलमानला मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवता येत नव्हती. पण काल वाढदिवसाला त्याने ई बाईक राईडचा आनंद घेतला

Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
सर्वांचा लाडका अभिनेता 'भाईजान' सलमान खान काल ६० वर्षांचा झाला. आपल्या मित्रपरिवारासह त्याने पनवेल येथील फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसासाठी फार्महाऊसबाहेर पापाराझींची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सलमानने मीडियासमोर केक कट केला. सिनेइंडस्ट्रीतील अनेक तारे त्याच्या बर्थडे पार्टीसाठी हजर होते. काही वेळाने रात्री फार्महाऊसबाहेर गाड्या निघाल्या. तेव्हा सलमानही गाडीत असल्याचं सगळ्यांना वाटलं. मात्र तो चक्क मागून इलेक्ट्रिक सायकलवरुन आला.
सलमान खानला सायकलिंगची प्रचंड आवड आहे. अनेकदा तो बांद्रा येथील घराबाहेरही सायकल चालवताना दिसतो. अगदी मध्यरात्रीही तो कधी भावासोबत तर कधी आपल्या भाच्यांसोबत सायकल राईडला निघतो. काही काळापासून सुरक्षेच्या कारणामुळे सलमानला मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवता आली नाही. मात्र काल आपल्या ६० व्या वाढदिवशी सलमानने स्वत:चीच इच्छा पूर्ण केली. त्याने पनवेल फार्म हाऊसबाहेर चक्क इलेक्ट्रिक सायकल चालवली. आधी काही कार बाहेर पडल्या तेव्हा सलमान कारमध्ये आहे असं समजून पापाराझी शूट करत होते. पण अचानक मागून सलमान सायकलवर आला. त्याला पाहून सगळे पापाराझी त्याच्या मागे लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सलमान खानने काल ६० व्या वाढदिवशी चाहत्यांना एक गिफ्टही दिलं. त्याचा आगामी 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर रिलीज झाला. 'मौत से क्या डरना...'हा त्याचा डायलॉग चांगलाच गाजत आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा सिनेमा २०२० च्या इंडो-चायना संघर्षावर आधारित आहे. सलमान यामध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे. तर चित्रांगदा सिंह मुख्य अभिनेत्री आहे.