"शत्रूला देखील होऊ नये..." सलमान खानने सोसल्या मरणयातना, दुर्धर आजाराचा भयंकर अनुभव केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:03 IST2025-09-25T13:02:57+5:302025-09-25T13:03:17+5:30
सलमान खानला गंभीर आजार झाला होता. हा आजार इतका भयंकर आहे की, त्यामुळे होणाऱ्या वेदनामुळे लोक आत्महत्या करतात.

"शत्रूला देखील होऊ नये..." सलमान खानने सोसल्या मरणयातना, दुर्धर आजाराचा भयंकर अनुभव केला शेअर
Salman Khan Battle Trigeminal Neuralgia: बॉलिवूड अभिनेता सलमान खान नुकताच प्राईम व्हिडीओच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने त्याच्या "ट्रायजेमिनल न्युराल्जिया" या दुर्धर आजाराबद्दलचा अनुभव सांगितला. या आजारामुळे होणाऱ्या वेदना इतक्या तीव्र होत्या की, असा आजार शत्रूलाही होऊ नये, असं सलमानने सांगितलं.
आपल्या वेदनांबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, "हा आजार म्हणजे एक अशी गोष्ट आहे, ज्याच्यासोबत तुम्हाला जगावेच लागते". सलमानने सांगितले की त्याला पहिल्यांदा या आजाराचा त्रास 'पार्टनर' चित्रपटाच्या सेटवर जाणवला. त्यावेळी अभिनेत्री लारा दत्ता त्याच्यासोबत होती. सलमान म्हणाला, "तिने माझ्या चेहऱ्यावरील एक केस काढला आणि त्याच क्षणी मला खूप तीव्र वेदना जाणवल्या. तिथूनच या आजाराची सुरुवात झाली".
जवळपास साडेसात वर्षे सलमानने या वेदना सहन केल्या. सलमान म्हणाला, "दर चार ते पाच मिनिटांनी मला तीव्र वेदना व्हायच्या. बोलत असताना किंवा खाताना अचानक त्रास सुरू व्हायचा. यामुळे मला नाश्ता करायला एक तास लागायचा. मी ऑम्लेट खायचो, कारण मला चघळता येत नव्हते".
सलमानने सांगितले की, या वेदना कमी करण्यासाठी तो ७५० मिलीग्राम पेनकिलर घेत असे, पण त्याचाही काही उपयोग होत नव्हता. या आजाराला "सुसाइडल डिसीज" म्हटले जाते, कारण लोक असह्य वेदना सहन न झाल्याने आत्महत्या करतात. या आजारावर उपचार म्हणून सलमान खानने गॅमा नाईफ शस्त्रक्रिया केली आहे, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर स्क्रू लावले जातात. ही ८ तासांची शस्त्रक्रिया होती. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितले होते की २० ते ३० टक्के वेदना कमी होतील, पण सलमानच्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत.