कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स...काजोल-ट्विंकलच्या प्रश्नावर काय म्हणाले सलमान-आमिर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:17 IST2025-09-25T19:17:09+5:302025-09-25T19:17:51+5:30
सलमान आणि आमिरचं वेगवेगळं मत, नक्की काय म्हणाले?

कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स...काजोल-ट्विंकलच्या प्रश्नावर काय म्हणाले सलमान-आमिर?
काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा नवा चॅट शो नुकताच प्राईम व्हिडिओवर आला आहे. दोघी बिंधास्त अभिनेत्री पहिल्यांदाच या प्रोजेक्टसाठी एकत्र आल्या आहेत. या शोमध्ये सलमान खान आणि आमिर खान हे पहिले पाहुणे म्हणून आले. काजोल आणि ट्विंकलने दोघांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तर सलमान-आमिरने आपापल्या स्टाईलमध्ये उत्तरं दिली. एकूणच शोची संकल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे.
दरम्यान शोमध्ये काजोल आणि ट्विंकलने सलमान-आमिरला हिरो-हिरोईनच्या वयातील अंतरावरुन प्रश्न विचारला. जेव्हा हिरो कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करतो तेव्हा त्याला सिनेमाची जादू म्हटलं जातं. हेच हिरोईन कमी वयाच्या हिरोसोबत रोमान्स करते तेव्हा तिला बोल्ड म्हटलं जातं. यावर आधी आमिर खान म्हणाला, "मला वाटतं कथेची जी गरज असेल त्याप्रमाणे कास्टिंग होते. जसं की दिल चाहता है मध्ये अक्षय खन्ना आणि डिंपल कपाडिया अशी जोडी होती. मी तरी कुठे कमी वयाच्या हिरोईनसोबत सिनेमे केलेत?' आमिरच्या या वाक्यावर ट्विंकल आणि काजोल एकत्रच 'बेबो' असं ओरडल्या. कारण आमिरने करीना कपूरसोबत ३ इडियट्समध्ये काम केलं होतं. आमिर पुढे म्हणाला, "फिल्ममेकिंग हे काही खऱ्या आयुष्यातलं नाही. म्हणजे पडद्यावर तुम्ही मरताय तर खरंच तर मरत नाही ना. हेही तसंच आहे."
तर या मुद्द्यावर सलमान खान म्हणाला, " मला वाटतं हे कथेवर अवलंबून आहे. जसं की श्रीदेवी आज असती आणि काम करत असती तर तिला हिरोईन म्हणूनच भूमिका ऑफर झाल्या असत्या. जसं की आज माधुरीही ते करु शकते. पण तशी भूमिका ऑफर झाली पाहिजे. जर कोणी कमी वयाचा हिरो, उभरता हिरो असेल तर निर्माते किंवा दिग्दर्शक नक्की माधुरीच्या अपोझिट अशा अभिनेत्याची निवड करु शकतात. आम्ही इतर अभिनेत्रींसोबत खूप काम केलं आहे त्यामुळे आमची जोडी आता जुनी दिसते. पडद्यावर काहीतरी फ्रेश दिसावं म्हणून आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलं नाही त्यांच्यासोबत काम करतो. पण तशी तुम्हा अभिनेत्रींनाही स्क्रिप्ट ऑफर झाली पाहिजे जेणेकरुन तुम्हीही कमी वयाच्या अभिनेत्यांसोबत काम कराल. मला नाही वाटत कोणालाच याबद्दल काही अडचण असेल."