Salim Khan Health Update: सलीम खान व्हेंटिलेटर सपोर्टवर! आज होणार शस्त्रक्रिया; सलमान आणि संपूर्ण कुटुंब रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 09:02 IST2026-02-18T09:00:30+5:302026-02-18T09:02:21+5:30
९० वर्षीय सलीम खान यांना मंगळवारी सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

Salim Khan Health Update: सलीम खान व्हेंटिलेटर सपोर्टवर! आज होणार शस्त्रक्रिया; सलमान आणि संपूर्ण कुटुंब रुग्णालयात
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येतेय. ९० वर्षीय सलीम खान यांना मंगळवारी सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नेमका त्रास काय झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना सकाळी चक्कर आणि अस्वस्थता जाणवू लागली. तपासणी दरम्यान उच्च रक्तदाब झाल्याने (High Blood Pressure) त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ (Blood Clot) झाल्याचे निदान झाले आहे. सुरुवातीला त्यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. रक्ताची ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे समजते.
लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली की, सलीम खान यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आज सर्जरी झाल्यावर सलीम खान या आजारपणातून बरे होतील अशी चाहत्यांना आशा आहे.
वडील सलीम खान यांच्या आजारपणाची बातमी मिळताच सलमान खान आपल्या चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावर सोडून तातडीने रुग्णालयात पोहोचला. सलमानसोबतच अरबाज खान, सोहेल खान, अलविरा, अर्पिता आणि त्यांच्या दोन्ही पत्नी सलमा आणि हेलन देखील रुग्णालयात उपस्थित आहेत. रुग्णालयाबाहेरील सलमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे चिंता दिसून येत आहे.
सलीम खान यांनी आपल्या लेखणीने हिंदी चित्रपटसृष्टीला 'शोले', 'जंजीर' आणि 'दीवार' यांसारखे ऐतिहासिक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रकृतीची बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.