थिएटरमध्ये रडून बेशुद्ध होणारी माणसं मुद्दाम बसवली? 'सैयारा'चे निर्माते म्हणाले- "खरं सांगायचं तर..."
By देवेंद्र जाधव | Updated: August 1, 2025 11:58 IST2025-08-01T11:56:51+5:302025-08-01T11:58:10+5:30
'सैयारा' सिनेमाच्या निर्मात्यांनी थिएटरमध्ये रडणारी माणसं मुद्दाम बसवली या चर्चांवर मौन सोडलंय. याशिवाय मोठा खुलासा केलाय

थिएटरमध्ये रडून बेशुद्ध होणारी माणसं मुद्दाम बसवली? 'सैयारा'चे निर्माते म्हणाले- "खरं सांगायचं तर..."
सध्या 'सैयारा' सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. हा सिनेमा युवा पिढीने चांगलाच डोक्यावर घेतलेला दिसतोय. हा सिनेमा पाहताना अनेक तरुण-तरुणींच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. इतकंच नव्हे काहीजण इतके रडले की त्यांना चक्कर आली. आपल्या मित्राला अचानक चक्कर आलेली पाहून दुसऱ्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं. याशिवाय एक माणूस थेट सलाईन घेऊन थिएटरमध्ये गेलेला दिसला. 'सैयारा' सिनेमाच्या निर्मात्यांनी मुद्दाम ही माणसं थिएटरमध्ये पाठवून स्ट्रॅटेजी केली, अशी चर्चा होती. याबद्दल 'सैयारा'च्या निर्मात्यांनीच खुलासा केलाय.
'सैयारा'चे निर्माते काय म्हणाले?
'सैयारा'चे निर्माते अक्षय विधानींनी याविषयी मौन सोडलंय. अक्षय म्हणाले, "जे लोक सिनेमा पाहून रडत आहेत त्यांचा मेकर्सशी काही संबंध नाही. कोणी ड्रीप लावून येतं कोणी सिनेमा पाहताना ओरडतं कोणी शर्ट काढून नाचतं तर कोणी सिनेमा पाहून रडतं. आम्हाला अनेक लोक सिनेमा पाहून ते किती भावुक झाले हे फोनवर सांगतात. त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद म्हणेन. सिनेमा लोकांना भिडण्यात यशस्वी झालाय म्हणूनच ते रडत आहेत."
"मोहितने अनेक वर्षांनंतर लोकांना भावनिक कनेक्शन निर्माण होईल, असा सिनेमा बनवला आहे. खरं सांगायचं तर, सिनेमा इतक्या खोलपणे लोकांच्या मनावर परिणाम करतोय हे पहिल्यांदाच आणि खूप काळानंतर घडतंय", अशाप्रकारे अक्षय यांनी याविषयी खुलासा केला आहे. 'सैयारा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं तर, या सिनेमाने रिलीजपासून काही दिवसांमध्ये २८० कोटींचा व्यवसाय केला आहे. अजूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी शक्यता आहे. माउथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमाने चांगली कमाई केली आहे.