"आमच्यात आजही बोलणं होतं...", एक्स वाईफ अमृता सिंहविषयी सैफ अली खान म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:49 IST2025-10-09T17:48:01+5:302025-10-09T17:49:04+5:30
अमृता माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती, सैफ अली खानचं भाष्य

"आमच्यात आजही बोलणं होतं...", एक्स वाईफ अमृता सिंहविषयी सैफ अली खान म्हणाला...
अभिनेता सैफ अली खानने १९९१ साली अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं. तेव्हा सैफ अमृताहून १२ वर्षांनी लहान होता. वयाच्या २१ व्या वर्षीच त्याने अमृताशी लग्नगाठ बांधली होती. तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. दोघांना सारा आणि इब्राहिम ही मुलंही झाली. मात्र नंतर दोघांमध्ये बिनसलं आणि २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सैफ-अमृता पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत.
नुकतंच 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल शो'मध्ये सैफ अली खान आणि अक्षय कुमारने हजेरी लावली. तेव्हा सैफ अमृताविषयी म्हणाला, "मी याआधीही यावर बऱ्याचदा बोललो आहे. माझं आणि अमृताचं लग्न झालं तेव्हा माझं वय २१ वर्ष होतं. आयुष्यात गोष्टी बदलत राहतात. आमचं लग्न फार काळ टिकलं नाही. आमची दोन छान मुलं आहेत. अमृता माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती. सिनेसृष्टीत कसं काम करावं हे तिनेच मला सांगितलं. तिच्यामुळे मला इंडस्ट्रीत अनेक गोष्टी समजल्या. त्या वेळी तिचं माझ्या आयुष्यातील योगदान आणि तिने केलेली मदत खरोखर अमूल्य होती. पण आमचं नातं टिकलं नाही हे दुर्दैव आहे."
हे ऐकून काजोल म्हणाली, "तिने तुला खरंच अनेक पद्धतींनी मोठं केलं.' यावर सैफ म्हणाला, "हो, मी तिच्याकडून खूप काही शिकलो. ती बेस्ट आई आहे. मला वाटतं आजही आमच्यात चांगलं नातं आहे. कधी कधी महत्वाच्या गोष्टींबाबत आमच्यात चर्चा होते. जेव्हा मी आजारी असतो, रुग्णालयात असतो तेव्हाही आमचं बोलणं होतं. आमच्यात संपर्क राहावा म्हणून सतत आजारी पडतो(हसतच)"
अमृता आणि सैफच्या लग्नाची आणि नंतर घटस्फोटाचीही बीटाऊनमध्ये खूप चर्चा झाली होती. घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा लग्न केलं नाही. तसंच ती सैफ आणि त्याच्या कुटुंबासोबतही पुन्हा कधीच दिसली नाही. तिने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तसंच मुलांना सैफपासून कधीच दूरही ठेवलं नाही. आज तिची मुलं सैफची दुसरी पत्नी करीना कपूरसोबतही चांगली मिसळली आहेत. काही महिन्यांपूर्वी सैफवर त्याच्या घरातच हल्ला झाला होता. आश्चर्य म्हणजे तेव्हाही अमृता त्याला भेटायला रुग्णालयात आली नाही.