रुग्णालयातून निघताना अँब्युलन्स का नाही घेतली? सैफ अली खानने आता दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:07 IST2025-10-09T12:06:56+5:302025-10-09T12:07:32+5:30
सैफ अली खानवर जानेवारी महिन्यात हल्ला झाला होता ज्याच तो गंभीर जखमी झाला. मात्र दोनच दिवसात तो रुग्णालयातून स्वत: चालत बाहेर आला. ना व्हीलचेअर ना अँब्युलन्स घेतली. यावर तो म्हणाला...

रुग्णालयातून निघताना अँब्युलन्स का नाही घेतली? सैफ अली खानने आता दिलं उत्तर
यावर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात बॉलिवूड हादरलं होतं. सैफ अली खानच्या घरी मध्यरात्री घुसलेल्या चोराने अभिनेत्यावर हल्ला केला होता. चोर सैफच्या धाकट्या मुलाच्या जेहच्या खोलीत होता. सैफने जीव धोक्यातून घालून चोराशी दोन हात केले होते. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. नंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सैफने व्हीलचेअर किंवा अँब्युलन्सने जायला नकार दिला. याचं कारण आता त्याने सांगितलं आहे.
'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये सैफ अली खान आणि अक्षय कुमार पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा सैफने त्या रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला. सैफ म्हणाला, "मी रुग्णालयात स्वत:च पोहोचलो तेव्हा इमर्जन्सी एरियातील लोक झोपलेले होते. मी एका माणसाला विचारलं,'स्ट्रेचर मिळेल का?' तो म्हणाला, 'व्हीलचेअर?'. मी म्हणालो, 'नाही, स्ट्रेचर हवंय.' त्याने नकार दिला. मी म्हणालो, 'अरे मी सैफ अली खान आहे. मेडिकल इमर्जन्सी आहे. यानंतर खळबळ उडाली.'
सैफ पुढे म्हणाला, "रुग्णालयातून घरी येतानाही माझी स्थिती तशी खराब होती पण सगळं ठीक झालं होतं. मला टाके लागलेहोते आणि एक आठवडा मी तिथे होतो. पाठ ठीक होती पण चालायला त्रास होत होता. तरी मी चालत होतो. व्हीलचेअरची गरज नव्हती. मग कोणीतरी म्हणालं, 'तू अँब्युलन्सने गेला पाहिजे'. पण माझ्या मनात आलं की मला कुटुंबीय आणि माझ्या चाहत्यांना अजिबातच चिंतेत टाकायचं नाहीय. म्हणून मी कारनेच घरी गेलो."
सैफ अली खानवर हल्ला केलेला चोर बांगलादेशी असल्याचं नंतर पोलिस तपासात समोर आलं. चोराला शोधायलाच पोलिसांना आठवडा लागला होता. सैफवर झालेल्या हल्ल्याची देशभरात चर्चा झाली.