चाकू हल्ल्याच्या घटनेनंतरही सैफ घरात ठेवणार नाही बंदूक, अभिनेत्याने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:10 IST2025-02-10T12:09:36+5:302025-02-10T12:10:05+5:30
सैफ अली खान पहिल्यांदाच जीवघेण्या हल्ल्याबद्दल व्यक्त झाला आहे.

चाकू हल्ल्याच्या घटनेनंतरही सैफ घरात ठेवणार नाही बंदूक, अभिनेत्याने सांगितलं कारण
Saif Ali Khan on Knife Attack: अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री वांद्रे येथील घरात हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या हल्लेखोरापासून मुलांना वाचवताना सैफ गंभीर जखमी झाला होता. संपुर्ण कुटुंब धोक्यात आलं होतं. पण, एवढ्या मोठ्या या घटनेनंतरही सैफ त्याच्या घरात बंदूक ठेवणार नाही. त्याने याचे कारणही सांगितले आहे.
सैफ पहिल्यांदाच जीवघेण्या हल्ल्याबद्दल दिल्ली टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाला आहे. घरात बंदूक न ठेवण्याचा निर्णयाचा खुलासाही स्वतः अभिनेत्याने केला आहे. मुलाखतीमध्ये जेव्हा सैफला विचारण्यात आला की त्याच्याकडे बंदूक का नाही? यावर तो म्हणाला, "पुर्वी माझ्याकडेही बंदूक होती. सुदैवाने आता माझ्याकडे ती नाही. मुलांच्या हाताला जर बंदूक लागली तर कठीण होईल. पतौडीमध्ये बंदुका आहेत. माझे वडील बेडजवळ बंदूक घेऊन झोपायचे. पण कधीकधी, मला वाटतं की बंदूक असल्याने अपघात होतात. लहान मुले त्याच्याशी खेळू शकतात, काय होईल देव जाणे".
पुढे तो म्हणाला, "घरात काही तलवारी अशा असतात ज्या फक्त सजावटीच्या असतात". पुढे तो म्हणाला, "मला वाटत नाही की मी कोणत्याही धोक्यात आहे. हा पूर्वनियोजित हल्ला नव्हता. मला वाटतं तो फक्त एक लुटमारीचा प्रयत्न होता. त्या बिचाऱ्या माणसाचे आयुष्य माझ्यापेक्षाही वाईट आहे".
दरम्यान, ३० वर्षीय शरीफूल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास याला मागच्या महिन्यात अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सध्या शरीफूल इस्लाम उर्फ विजय दास हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं आहे.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सैफ अली खान लवकर 'The Jewel Thief' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सैफचा "ज्वेल थेफ्ट – द रेड सन चॅप्टर" हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सैफबरोबर यामध्ये जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा ५०० कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या चोरीवर आधारित आहे.दरम्यान, सध्या सैफला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे.