Saif Ali Khan : हल्ल्यानंतर सैफ-करीनाने घेतला मोठा निर्णय, पापाराझींना केली विनंती, म्हणाले- "तैमूर-जेहचे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 10:53 IST2025-01-29T10:53:01+5:302025-01-29T10:53:47+5:30
Saif Ali Khan-Kareena Kapoor : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. आता सैफ-करीनाने मोठे पाऊल उचलले आहे

Saif Ali Khan : हल्ल्यानंतर सैफ-करीनाने घेतला मोठा निर्णय, पापाराझींना केली विनंती, म्हणाले- "तैमूर-जेहचे"
अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)वर झालेल्या हल्ल्यानंतर कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. आता सैफ-करीना(Kareena Kapoor)ने मोठे पाऊल उचलले आहे. पापाराझींना त्यांची मुले तैमूर आणि जेहचे फोटो काढू नयेत अशी विनंती केली आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ जाऊ नका. पण, जर त्यांना हवे असेल तर ते सैफ-करीनाचा फोटो घेऊ शकतात, पण तेही ते एखाद्या कार्यक्रमाचा भाग असताना.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ केलीय. एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबाची काळजीदेखील घेतली जात आहे. आता खान कुटुंबाने पापाराझींना विनंती केली आहे की, त्यांच्या मुलांचे फोटो काढू नयेत आणि कुठेही कधीही त्यांचा पाठलाग करू नये किंवा कोणत्याही ठिकाणी त्यांना अप्रोच करू नये.
सैफ आणि करीनाने केली विनंती
आज तकच्या रिपोर्ट नुसार, सैफ अली खान आणि करीना कपूरचे पीआर मॅनेजर पापाराझींना भेटले. या मीटिंगमध्ये मॅनेजरने सैफ-करीनाने दिलेल्या सर्व सूचना चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या. सैफ आणि करीनाच्या पीआर मॅनेजरने पापाराझींना त्यांच्या मुलांचे तैमूर आणि जहांगीरचे फोटो कुठेही न काढण्याची विनंती केली. ते खेळायला गेलेल्या बागेत असोत किंवा वाढदिवसाच्या पार्टीत किंवा क्रीडा संकुलात. पीआर मॅनेजरने मंगळवार २८ जानेवारीच्या संध्याकाळी मुंबईतील खार येथील त्यांच्या कार्यालयात पापाराझींची भेट घेतली.
इव्हेंटमध्ये काढता येतील फोटो
पीआर मॅनेजरने सांगितले की, करीना आणि सैफ कोणत्याही इव्हेंटमध्ये सहभागी होत असल्यास त्यांचे फोटो काढता येतील. तसेच सैफ-करीनाने पापाराझींना विनंती केलीय की, त्यांनी त्यांच्या घराखाली उभे राहू नये आणि घरातून बाहेर पडताना किंवा परत येताना किंवा कोणाला भेटायला जाताना त्यांचे फोटो काढू नयेत. सैफ अली खानवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व काही सांगितले.
काय होतं प्रकरण?
१६ जानेवारीच्या रात्री सैफच्या घरात घुसलेल्या एका चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. यानंतर त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ५ दिवसांनी अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता तो घरी रिकव्हर होतो आहे. घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीय घाबरले आहेत. सैफ घरी आल्यापासून त्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. अभिनेता रोहित रॉयच्या सुरक्षा कंपनीचे गार्ड तैनात करण्यात आले आहेत. सरकारने हवालदारांचीही नियुक्ती केली आहे.