चाकू हल्ल्याच्या वेळेस नेमकं काय घडलं? सैफ अली खानने पहिल्यांदाच सांगितलं, म्हणाला- "माझ्या डोळ्यासमोर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:57 IST2025-09-26T15:53:57+5:302025-09-26T15:57:07+5:30
सैफ अली खानच्या चाकू हल्ला त्यावेळची परिस्थिती काय होती, स्वतःची अवस्था कशी होती, याबद्दल सविस्तर त्याने सांगितलं आहे

चाकू हल्ल्याच्या वेळेस नेमकं काय घडलं? सैफ अली खानने पहिल्यांदाच सांगितलं, म्हणाला- "माझ्या डोळ्यासमोर..."
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काही महिन्यांपूर्वी त्याच्या मुंबईतील घरावर चाकू हल्ला झाला. यावेळी सैफला चांगलाच मार बसला आणि तो गंभीर जखमी झाला होता. सैफ या हल्ल्याबद्दल आजवर कधीच जाहीरपणे बोलला नव्हता. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने चाकू हल्ल्यावर त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाला सैफ? जाणून घ्या.
सैफने एस्क्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलं. सैफ म्हणाला, "हा एक विचित्र अनुभव होता. पण आम्ही किती भाग्यवान आहोत, कारण चाकू हल्ला अगदी जवळून झाला होता. त्यातून कोणत्याही दुखापतीशिवाय बाहेर पडणं एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतं."
सैफने पुढे सांगितलं की, ''जेव्हा मी जमिनीवर जखमी अवस्थेत पडलो होतो, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण आयुष्य क्षणार्धात धावून गेलं. अशी गंभीर परिस्थिती अचानक समोर आल्याने हा परिणाम असू शकतो. पण आठवतंय की, मी विचार करत होतो, आयुष्य किती वेगळं आहे आणि मला अनेक ठिकाणी जाण्याचं भाग्य लाभलं आहे. ही गोष्ट केवळ पैशांची नाही कारण अनेकांकडे खूप पैसा असतो. पण त्यावेळी मी विनचेस्टरच्या त्या अनोख्या वातावरणाचा, आपल्या माणसांसोबत केलेल्या सर्व प्रवासांचा, वाईन, माझ्या मुलांचा, पत्नीचा विचार करत होतो."
हल्ला झाल्यावर मिळाली ही शिकवण
सैफ अली खानने यापूर्वी या घटनेतून कोणती शिकवण मिळाली याचा अनुभव सांगितला होता. सैफ म्हणाला की, "माझी शिकवण हीच आहे की, तुम्ही दरवाजे बंद ठेवले पाहिजेत आणि सावध राहिलं पाहिजे. आपल्याकडे खूप काही आहे, पण खूप काही नाहीये. त्यामुळे मी कृतज्ञ आहे, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे. घरातल्या काही गोष्टी बंद करुन ठेवा. जिथून प्रवेश होऊ शकतो त्या जागा ब्लॉक करा आणि सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली करा."
सैफने वाढवली सुरक्षा
या हल्ल्यानंतर सैफ अली खानने आपली सुरक्षा अधिक वाढवली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, "हे दुःखद आहे. माझा कधीही सुरक्षेवर विश्वास नव्हता. माझ्या आजूबाजूला लोक असणं मला आवडत नाही, पण निदान काही काळासाठी तरी हे आवश्यक आहे." सैफने पुढे भावुक शब्दात म्हटलं की, "माझ्या जाण्याची वेळ आली नव्हती. कदाचित मला आणखी काही चांगले चित्रपट करायचे असतील. कुटुंब आणि मित्रांसोबत आणखी चांगला वेळ घालवायचा असेल. आणखी काही दानधर्म करायचा असेल!"
हल्ल्याची घटना
१६ जानेवारीच्या पहाटे सैफ अली खानच्या मुंबईतील घरावर एका घुसखोराने चाकूने हल्ला केला होता. त्यामुळे मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या आरोपीला काही दिवसांनंतर अटक करण्यात आली होती. तो लुटमारीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला होता आणि त्याने अभिनेता तसेच त्याच्या स्टाफवर लाकडी शस्त्र आणि ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप आहे.