'साडे माडे तीन' सिनेमासाठी सचिन पिळगावकरांनी सुचवली 'ही' खास गोष्ट, सचित पाटीलने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:24 IST2025-11-26T11:22:30+5:302025-11-26T11:24:33+5:30
सचित पाटीलने साडे माडे तीनची कथा सचिन पिळगावकरांना ऐकवली तेव्हा त्यांनी काय केलं? वाचा हा खास किस्सा

'साडे माडे तीन' सिनेमासाठी सचिन पिळगावकरांनी सुचवली 'ही' खास गोष्ट, सचित पाटीलने केला खुलासा
'साडे माडे तीन' हा सिनेमा सर्वांना माहितच असेल. २००६ साली आलेला हा सिनेमा आजही पाहिला तरीही प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन होतं. भरत जाधव, अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे या त्रिकुटाने हा सिनेमा चांगलाच गाजवला. अंकुश चौधरी आणि सचित पाटील या दोघांनी मिळून या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. अशातच 'साडे माडे तीन' सिनेमाबद्दलची खास आठवण सचित पाटीलने शेअर केली आहे. सचिन पिळगावकरांनी या सिनेमासाठी दिलेला खास सल्ला सचितने सांगितला आहे.
सचित पाटीलने सांगितला खास किस्सा
आरपारला दिलेल्या मुलाखतीत सचित पाटील म्हणाला, ''मी आणि संजय मोने सचिनजींकडे गेलो. सचिनजींनी सिनेमा ऐकला. त्यांना खूप आवडला. चलती का नाम गाडी सिनेमाचा हा ऑफिशिअल रिमेक होता. सचिनजींनी मला एक-दोन सुचना फार छान दिल्या. त्यानंतर म्हणाले की, अशोक सराफ-भरत जाधव आणि मकरंद यांच्यात काय साम्य आहे? मी म्हटलं साम्य तर नाहीये. हे तिघे म्हणजे सुपरस्टार्स होते तेव्हाचे.''
''सचिनजी मला म्हणाले, हे तिघे भाऊ कसे दिसतील? मी म्हटलं हो, भाऊ तर नाही दिसणार. पण कास्टिंग आम्ही यासाठी केलंय की, चित्रपट आम्हाला यशस्वी व्हावा असं वाटतं. कारण हे तिघे आता यशाच्या शिखरावर आहेत. बेस्ट कास्टिंग आहे. त्यातल्या त्यात आम्ही काय केलं की, तिघांना आम्ही कुरळे केस दिले आहेत. पुढे सचिनजी म्हणाले, एक काम करा, या तिघांचं आडनाव कुरळे बंधू करा.''
''आम्हाला ही आयडिया छान वाटली. म्हणून मग सिनेमाची सुरुवात आम्ही, कुरळे गॅरेज अशा बोर्डपासून दाखवली.'', अशाप्रकारे 'साडे माडे तीन' सिनेमासाठी सचिन पिळगावकरांनी दिलेली खास सुचना सिनेमासाठी फायदेशीर ठरली. लवकरच या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल अर्थात 'साडे माडे तीन २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.