71st National Award: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी निर्माते अपूर्व मेहतांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 21:27 IST2025-09-23T21:27:15+5:302025-09-23T21:27:51+5:30
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटाला यंदाच्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं

71st National Award: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी निर्माते अपूर्व मेहतांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
आज ७१ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना जाहीर झाले त्यांना गौरवण्यात आलं. यावेळी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होतो. याच पुरस्कार सोहळ्यात करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानिमित्त सिनेमाचे निर्माते अपूर्व मेहता यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
अपूर्व मेहता यांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान
७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक फिल्म (बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोवायडिंग होलसम एंटरटेनमेंट) या कॅटेगरीत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानिमित्त निर्माते अपूर्व मेहता यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. या सिनेमाचा दिग्दर्शक करण जोहर सुद्धा या खास क्षणी उपस्थित होता. अपूर्व मेहता यांनी सन्मान स्वीकारल्यावर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाबद्दल
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट दोन वेगळ्या संस्कृतींमधील दोन जोडी एकत्र येतात, तेव्हा काय घडतं याची रंजक कहाणी दाखवतो. रॉकी रंधावा (रणवीर सिंग) आणि रानी चटर्जी (आलिया भट्ट) यांच्या पात्रांमधून चित्रपटाने लैंगिक समानता, कौटुंबिक तणाव आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासारख्या मुद्द्यांवर संवेदनशीलपणे भाष्य केले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे.
यंदाचा ७१ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा खास होता. कारण 'जवान' सिनेमासाठी शाहरुख खान आणि '१२वी फेल' या चित्रपटासाठी विक्रांत मेसी यांना संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शाहरुखचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. राणीला 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या सिनेमासाठी हा पुरस्कार दिला आहे.