धाकट्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला, "तू आमचं जग उजळवतोस…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:51 IST2025-06-01T16:50:56+5:302025-06-01T16:51:16+5:30

रितेशनं भावुक पोस्ट करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Riteish Deshmukh's Writes Special Post On His Younger Son Rahyl Birthday | धाकट्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला, "तू आमचं जग उजळवतोस…"

धाकट्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला, "तू आमचं जग उजळवतोस…"

मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील लाडकी जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख. रितेश-जिनिलियाला आज महाराष्ट्राचे दादा-वहिनी अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे. सोशल मीडियावर दोघंही कायम सक्रिय असतात. रितेश-जिनिलिया त्यांचे फोटो, कुटुंबीयांचे मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. आज रितेशचा धाकटा मुलगा राहील ( Deshmukh) याचा वाढदिवस आहे. राहीलच्या वाढदिवसानिमित्त रितेशनं भावुक पोस्ट करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

आज राहीलचा वाढदिवस आहे. राहीलचा १ जून जन्म २०१६ मध्ये झाला. आज त्याचा नववा वाढदिवस आहे. रितेशनं राहिलचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, "जेव्हा तू आमच्या आयुष्यात आलास, तेव्हापासून तू आनंद, ऊर्जा आणि अमाप प्रेम घेऊन आलास. तुझी निर्भयता, खोडकरपणा,  फुटबॉलवरचं प्रेम आणि तुला मोठं होताना पाहणं, हे आयुष्याचं सर्वात सुंदर साहस ठरलं आहे. तू उत्साहाने धावतोस, मनापासून स्वप्नं पाहतोस आणि प्रत्येक आव्हानाला ज्या धैर्याने सामोरा जातोस, ते आम्हाला कायम प्रेरणा देतं".


पुढे त्यानं लिहलं, "मैदानावर गोल करताना असो किंवा तुझ्या हसण्याने आमच्या चेहऱ्यावर हसू फुलतं, तू आमचं जग प्रेमाने, प्रकाशाने आणि अभिमानाने भरून टाकतोस. तू असा असाच अप्रतिम, धाडसी आणि थांबवता न येणारा 'राहील' राहा. तुझ्या असण्यानं आमचा प्रत्येक दिवस उजळतो. तुझ्यावर किती प्रेम करतो ते शब्दांत सांगता येणार नाही. येणारा वर्ष तुझ्यासाठी आनंद, फुटबॉल आणि विसरणार नाही अशा साहसांनी भरलेला असो! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा !!!", या शब्दात अभिनेत्यानं मुलाला शुभेच्छा दिल्या. रितेश देशमुखच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी राहीलच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

Web Title: Riteish Deshmukh's Writes Special Post On His Younger Son Rahyl Birthday