रितेश देशमुखची सासरेबुवांसाठी खास पोस्ट, म्हणाला "आयुष्यातील मोठ्या अडचणी हसतमुखाने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:13 IST2025-12-19T13:12:18+5:302025-12-19T13:13:04+5:30
रितेशचं त्याच्या सासरच्या मंडळींशी असलेले नाते किती घट्ट आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

रितेश देशमुखची सासरेबुवांसाठी खास पोस्ट, म्हणाला "आयुष्यातील मोठ्या अडचणी हसतमुखाने..."
Riteish Deshmukh Post For Father In Law : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमख. ते महाराष्ट्राचे लाडके 'दादा-वहिनी' म्हणून ओळखले जातात. रितेश हा केवळ एक उत्तम अभिनेताच नाही, तर तो एक आदर्श कौटुंबिक माणूस म्हणूनही ओळखला जातो. रितेशचं आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. त्याचं जिनिलियाच्या आई-वडिलांवरही खूप प्रेम आहे. रितेशचं त्याच्या सासरच्या मंडळींशी असलेले नाते किती घट्ट आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. रितेशने त्याचे सासरे नील डिसूझा यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
जिनिलियाचे वडील नील डिसूझा यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सासरेबुवांना रितेश 'पॉप्स' या प्रेमळ नावाने हाक मारतो. त्याच्या या खास दिवशी रितेशनं त्यांच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, "प्रिय पॉप्स!!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!! आयुष्यातील सर्वात मोठ्या अडचणींचा हसतमुखाने सामना केला पाहिजे, हा सर्वात मोठा धडा मी तुमच्याकडून शिकलो आहे. मला स्वतःला अधिक चांगलं माणूस बनण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार".
रितेशने पुढे आपल्या सासऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना म्हटलं, "तुम्हाला उत्तम आरोग्य, हास्य आणि प्रेमाने भरलेलं दीर्घ आयुष्य लाभो, हीच मनापासून इच्छा". रितेशच्या या शब्दांनी केवळ त्याच्या सासऱ्यांचेच नाही, तर सोशल मीडियावरील हजारो चाहत्यांचेही मन जिंकले आहे.
रितेश आणि जिनिलिया ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. रितेश-जिनिलियाच्या सुखी संसाराची १३ वर्षे खूपच कमाल होती. देशमुख कुटुंबात लग्न करून आल्यानंतर जिनिलियानं सर्वांना आपलंसं केलं. अगदी तसंच रितेशनंही जिनिलियाच्या आई-वडिलांना तेवढंच प्रेम आणि आदर दिला आणि त्यांना आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनवलं आहे.