माझी ट्रिटमेंट आयुर्वेदासारखी...! रितेशने शेअर केला विलासरावांचा ‘बोलका’ व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:41 IST2021-08-25T16:41:24+5:302021-08-25T16:41:43+5:30
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रितेशचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

माझी ट्रिटमेंट आयुर्वेदासारखी...! रितेशने शेअर केला विलासरावांचा ‘बोलका’ व्हिडीओ
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) याचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh )आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी विसरता येणे शक्य नाही. रितेशही सोशल मीडियावर सतत त्यांच्या आठवणी शेअर करत असतो. आता रितेशने वडिलांच्या एका मुलाखतीचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रितेशचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे सध्या राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. यावरून काल दिवसभर राज्यात हायहोल्टेज ड्रामाही रंगला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांना काल अटक करण्यात आली आणि काहीच तासांत जामिनावर त्यांची सुटकाही झाला. नेमक्या याचवेळी रितेशने विलासरावांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते आक्रमक स्वभावाबद्दल बोलत आहेत.
या व्हिडीओत विलासराव म्हणतात, ‘ माझे सर्वांशी प्रेमाचे संबध आहेत. माझ्यावर टीका करणाºयासोबतही मी प्रेमाने वागत असतो, बोलत असतो. मी लगेच व्यक्त होणारा नाही, मी कृतीतून व्यक्त होतो. मी रिअॅक्ट व्हावं, अशी अनेकदा लोकांची अपेक्षा असते. परंतु प्रत्येकाची कामाची स्टाईल ही वेगळी असते. काही लोक अधिक आक्रमक असतात. अनेकांना असे लोक अणिक बरे वाटतात. पण त्याच्यावर माझा फारसा विश्वास नाहीये. कारण मी त्या संस्कृतीतून आलेलो नाही. आपण शांतपणे आणि संयमाने राज्यकारभार करून लोकांशी वागलं पाहिजे, असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे माझ्याबद्दलची लोकांची मतं ही वेगळी असू शकतात. माझी ट्रीटमेंट ही लाँग टर्म आहे, शॉर्ट टर्म नाही. ती अॅलोपॅथीसारखी नाही, तर आयुर्वेदासारखी आहे.’
रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. केवळ 5 तासांत अडीच लाखांवर लोकांनी तो पाहिला आहे. लोकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.