"मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो बायको..."व्हॅलेंटाईन वीकमध्ये रितेश देशमुखची जिनिलियासाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:34 IST2026-02-12T11:33:22+5:302026-02-12T11:34:46+5:30
रितेश आणि जिनिलिया सगळ्यांना कायम कपल गोल्स देत असतात.

"मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो बायको..."व्हॅलेंटाईन वीकमध्ये रितेश देशमुखची जिनिलियासाठी खास पोस्ट
बॉलिवूडमधील सर्वात क्यूट आणि आदर्श कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ओळखले जातात. दोघांची मैत्री, प्रेम आणि एकमेकांप्रती असलेला आदर नेहमीच चाहत्यांना भावतो. सोशल मीडियावरही ते दोघे प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या रील्स चाहत्यांमध्ये व्हायरल होतात. रितेश आणि जिनिलिया सगळ्यांना कायम कपल गोल्स देत असतात. अलिकडेच रितेश आणि जिनिलियाच्या लग्नाला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यामुळे लग्नाची १४ आणि डेटिंगची १० अशी २४ वर्षे ते एकमेकांच्या सोबत आहेत. यानिमित्ताने रितेशने जिनिलियासाठी एक खास आणि भावुक पोस्ट लिहिली आहे.
रितेशनं जिनिलियासोबतचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "बरोबर २४ वर्षांपूर्वी आपली मनं एकमेकांना सापडली आणि कधीच दूर गेली नाहीत. तू माझं सुरक्षित ठिकाण आहेस, माझं सर्वात वेडं साहस आहेस आणि माझं सगळ्यात कोमल स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहेस. दररोज मला निवडल्याबद्दल तुझे आभार. माझी मैत्रीण, माझं प्रेम, माझी कायमची बायको… मी तुझ्यावर अंतहीन, वेड्यासारखं प्रेम करतो", अशा शब्दांत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. चाहत्यांनी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
रितेश-जिनिलियाच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्या...
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची पहिली भेट २००२ मध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. जिनिलियाने सुरुवातीला रितेशकडे दुर्लक्ष केलं होतं. रितेश हा श्रीमंत घरातील बिघडलेला मुलगा असल्याचं जिनिलियाला वाटायचं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली. 'तुझे मेरी कसम' या सिनेमानंतर त्यांनी 'मस्ती' या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी ते लग्नबंधनात अडकले. रितेश-जिनिलायाचं लग्न ख्रिशन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत झालं होतं.