"लग्नाला १४ वर्षे झाली, हा वनवास..." रितेश देशमुखने खास स्टाईलमध्ये दिल्या जिनिलियाला शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:55 IST2026-02-03T13:53:49+5:302026-02-03T13:55:02+5:30
रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडीओ शेअर करत आपल्या हटके स्टाईलमध्ये पत्नी जिनिलियाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"लग्नाला १४ वर्षे झाली, हा वनवास..." रितेश देशमुखने खास स्टाईलमध्ये दिल्या जिनिलियाला शुभेच्छा
Riteish Genelia Deshmukh 14th Anniversary : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा आज त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी रितेशने सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडीओ शेअर करत आपल्या हटके स्टाईलमध्ये पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश आणि जिनिलिया हे त्यांच्या सोशल मीडियावरील विनोदी व्हिडीओंसाठी ओळखले जातात. लग्नाच्या वाढदिवशी रितेशने एक रील शेअर केलं आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो "आगे है बरसात पीछे है तूफान" या गाण्यावर डबिंग करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये रितेश पुढे बसून गाणं म्हणतोय, तर त्याच्या मागे जिनिलिया बसलेली दिसत आहे.
केवळ व्हिडिओच नाही, तर रितेशने दिलेलं हटके कॅप्शनही चाहत्यांना आवडलंय. रितेशने लिहिलंय, "लग्नाला १४ वर्षे झाली आहेत, हा वनवास कधीच संपू नये. वाढदिवसाच्या शुभेच्छा, बायको!". या व्हिडीओवर चाहत्यांनी "लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी साहेब", "तुम्हा दोघांवरही खूप प्रेम... तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" अशा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
१४ वर्षांचा सुखी संसार
३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जिनिलियाने लग्नगाठ बांधली होती. दोघांनी मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं. त्यांच्या प्रेमाची सुरुवात 'तुझे मेरी कसम' या पहिल्या चित्रपटाच्या सेटवरून झाली होती. लग्नाआधी त्यांनी जवळपास १० वर्ष एकमेंकाना डेट केलं होतं. या जोडीला रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत.