"पडद्यावर धरमजींना पाहणं हा भावनिक क्षण..."; धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' पाहून रितेश देशमुखची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:57 IST2025-12-31T10:50:02+5:302025-12-31T10:57:42+5:30
रितेश देशमुखने सोशल मीडियावर इक्कीस पाहून भावुक पोस्ट केली आहे. धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा पाहून रितेश भावुक झाला आहे

"पडद्यावर धरमजींना पाहणं हा भावनिक क्षण..."; धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' पाहून रितेश देशमुखची भावुक पोस्ट
धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' सिनेमा उद्या १ जानेवारीला रिलीज होणार आहे. धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा म्हणून सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी प्रीमिअर झाला. या प्रीमिअरला रितेश-जिनिलीया देशमुख उपस्थित होते. आता 'इक्कीस' पाहून अभिनेता रितेश देशमुखने धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल भावुक पोस्ट केली आहे. रितेशने काय लिहिलं?
'इक्कीस'बद्दल रितेशची भावुक पोस्ट
रितेशने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रितेश लिहितो, "काल रात्री मी 'इक्कीस' चित्रपट पाहिला आणि मी पूर्णपणे भारावून गेलो. हा केवळ एक युद्धपट नाही, तर रणांगणावरील जिवंत अनुभव देणारी एक कलाकृती आहे. प्रतिभावान दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी हा चित्रपट अतिशय उत्कृष्टपणे दिग्दर्शित केला आहे.''
''मोठ्या पडद्यावर धरमजींना पाहणंं हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. ते जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसायचे, तेव्हा मी शिट्ट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या आणि जल्लोष केला. प्रत्येक क्षण जिवंतपणे आणि खरेपणाने कसा जगावा, याचा धरमजी एक वस्तुपाठ होते. धरमजी, आम्ही तुम्हाला आणि तुमच्यातील अलौकिक प्रतिभेला कायम मिस करू.''

''जयदीप अहलावत, तू नेहमीच अविश्वसनीय काम करतोस. तुझे प्रत्येक काम उत्कृष्ट असते आणि या चित्रपटातही तेच पाहायला मिळाले. तुझ्या डोळ्यांत असलेली संवेदनशीलता आणि वेदना आम्हालाही जाणवली. प्रिय अगस्त्य, तू कमालीचे काम केले आहेस. भारताचे सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारतानाची जबाबदारी आणि शौर्यगाथा आपल्या खांद्यावर अत्यंत सन्मानाने आणि समर्थपणे पेलणे सोपे नव्हते, पण तू ते अगदी सहजपणे करून दाखवले आहेस. तू मोठ्या पडद्यासाठीच बनला आहेस... तुझ्या पुढच्या कामासाठी मी खूप उत्सुक आहे. तुझा सार्थ अभिमान वाटतो!''
''सिमर भाटिया, तुझे पदार्पण खूपच आत्मविश्वासाने भरलेले आहे. तुझा पडद्यावरील सहज वावर आणि संवेदनशीलता प्रत्येक फ्रेममध्ये लक्ष वेधून घेते. आणि अशा महत्त्वाच्या कथा जगासमोर आणणाऱ्या दिनेश विजन यांचे मनापासून अभिनंदन! 'इक्कीस' चित्रपट बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवो, हीच सदिच्छा!", अशाप्रकारे रितेशने पोस्ट लिहिली आहे.