विलासराव देशमुखांच्या 'त्या' एका प्रश्नामुळे रितेश बनला निर्माता! मराठीच्या दुरवस्थेवर मांडलं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:46 IST2026-03-16T11:42:59+5:302026-03-16T11:46:19+5:30
रितेश देशमुखने सांगितलं मराठी सिनेमा मागे पडण्याचं कारण; म्हणाला...

विलासराव देशमुखांच्या 'त्या' एका प्रश्नामुळे रितेश बनला निर्माता! मराठीच्या दुरवस्थेवर मांडलं रोखठोक मत
Riteish Deshmukh : चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने, विनोदी शैलीने आणि दिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये रितेश देशमुखचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतरही त्यानं मराठी सिनेसृष्टीत सक्रिय राहून अनेक लक्षवेधी कामे केली आहेत. अभिनयासोबतच स्पष्ट आणि परखड मत मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रितेश देशमुखनं अलीकडेच मराठी चित्रपटसृष्टीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. मुंबईत समाजवादी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'व्हिजन इंडिया' या कार्यक्रमात बोलताना त्यानं महाराष्ट्रात चित्रपटसृष्टीची सुरुवात होऊनही मराठी सिनेमा मागे आणि हिंदी सिनेमा पुढे का आहे, यावर रोखठोक मत व्यक्त केले.
समाजवादी पक्षाच्या एका कार्यक्रमात तो बोलत होता. News18 च्या वृत्तानुसार, रितेश म्हणाला, "चित्रपटसृष्टीचा जन्म महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत झाला आणि एका मराठी माणसाने, म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी शंभर वर्षांपूर्वी त्याची सुरुवात केली. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही, पण देशाच्या विविध भागांतून लोक इथे आले आणि त्यांनी हा प्रवास आपलासा केला, म्हणूनच मुंबई हे चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र बनले".
रितेश म्हणाला की, कर्नाटक किंवा केरळमध्ये तिथल्या स्थानिक चित्रपटांना पहिले प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रात १० ते ११ कोटी लोक मराठी बोलतात, ही संख्या काही दाक्षिणात्य राज्यांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तरीही तिथे प्रादेशिक सिनेमा जसा जोमाने व्यवसाय करतो, तसा तो महाराष्ट्रात करत नाही. आपल्याकडे प्रेक्षकांची पहिली पसंती हिंदी असते आणि मराठीला दुसरे स्थान दिले जाते".
मराठी सिनेमा मागे पडण्यामागचे सर्वात मोठे तांत्रिक आणि आर्थिक कारण रितेशने स्पष्ट केले. त्याच्या मते, "मराठी चित्रपट साधारणपणे ३ ते ७ कोटींच्या बजेटमध्ये बनतात. मात्र, प्रेक्षकांना ५ कोटींच्या मराठी सिनेमासाठी तेवढेच तिकीट दर मोजावे लागतात, जेवढे १०० कोटींच्या भव्य हिंदी सिनेमासाठी लागतात. एकाच दरात भव्यता पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक हिंदीकडे वळतात". ही तफावत दूर करण्याची गरज असल्याचे त्याने अधोरेखित केले.
रितेशने यावेळी आपले वडील दिवंगत विलासराव देशमुख यांच्या एका इच्छेचा उल्लेख केला. "तू हिंदीत काम करतोस, पण मराठी सिनेमासाठी काय करत आहेस?" या वडिलांच्या प्रश्नामुळेच आपण निर्मिती क्षेत्रात उतरलो, असे रितेशने सांगितले. तो म्हणाला, "गेल्या १०-११ वर्षांत माझ्या कंपनीने ६ चित्रपट बनवले असून ते सर्व मराठी आहेत. आपल्या प्रदेशातील कथा आपल्याच लोकांसाठी मोठ्या पडद्यावर मांडणे ही आपली जबाबदारी आहे".