Video: बायकोने सॉरी बोला...! जिनिलियाने मागितली माफी, रितेशची रिॲक्शन बघून हसू आवरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 16:53 IST2023-04-10T16:53:06+5:302023-04-10T16:53:52+5:30
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh : रितेश व जिनिलियाचा एक रिल व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओ फारच मजेशीर आहे....

Video: बायकोने सॉरी बोला...! जिनिलियाने मागितली माफी, रितेशची रिॲक्शन बघून हसू आवरणार नाही
रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख डिसूजा ( Genelia D'Souza) हे बॉलिवूडचं क्युट कपल आहे. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. म्हणूनच दोघांचा रिल व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. इतकंच काय, आणखी असे व्हिडीओ बनवा, म्हणून लोक या जोडप्याकडे मागणी करतात. सध्या रितेश व जिनिलियाचा एक मजेदार रिल व्हिडीओ व्हायरल होतोय.
सॉरी बोल...असं कॅप्शन देत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत बायको जिनिलियाही आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘ब्लफमास्टर’ चित्रपटातील अभिषेक बच्चन व नाना पाटेकर यांचा एक सुपरहिट सीन रिक्रिएट केला आहे. व्हिडीओ फारच मजेशीर आहे.
रितेश बायकोवर नाराज आहे. जाम रागावलेला आहे. तो तिला सॉरी बोलायला सांगतो. आता नवरा इतका रागावला म्हटल्यावर नाईलाजाने का होईना जिनिलिया त्याला सॉरी म्हणते. पण रितेशला ती नाईलाजाची माफी नको असते. तो तिला पुन्हा मनापासून माफी मागायला सांगतो. अच्छा सॉरी नहीं, सीधा सॉरी बोल... दिल से बोल..., असं तो म्हणतो. त्यावर जिनिलिया पुन्हा एकदा त्याला दिल से सॉरी म्हणते. आता बायको सॉरी म्हटल्यावर काय तर रितेश तडक उचून आनंदाने नाचायला लागतो. कुदरत का करिश्मा, बायकोने सॉरी बोला...या भावनेनं तो खुर्चीवरून उठून नाचायला लागतो. तर त्याला नाचताना पाहून जिनिलियाला हसू आवरत नाही.
रितेश व जिनिलियाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. लई खूश होऊ नको दादा, परत हजार वेळा तुला सॉरी बोलायचं आहे, अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे. अनेकांनी भाऊ व वहिनींच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे. तुम्ही दोघंही कमाल आहात, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.