रणबीर-करीनानंतर आता कपूर घराण्यातील 'ही' सुंदरी करतेय ग्रँड बॉलिवूड डेब्यू, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:18 IST2026-04-11T09:35:53+5:302026-04-11T10:18:35+5:30
बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचा चांगलाच दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे घराणं इंडस्ट्रीवर एक प्रकारे राज्य करत आहे

रणबीर-करीनानंतर आता कपूर घराण्यातील 'ही' सुंदरी करतेय ग्रँड बॉलिवूड डेब्यू, कोण आहे ती?
बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचा चांगलाच दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे घराणं इंडस्ट्रीवर एक प्रकारे राज्य करत आहे. कपूर कुटुंबातील जवळपास ४ पिढ्या बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी चाहत्यांना ठावूक आहे. पृथ्वीराज कपूरपासून ते रणबीर कपूरपर्यंत अनेक सुपरस्टार या घराने इंडस्ट्रीला दिले आहेत. इतकंच नाही तर प्रत्येकजण यशस्वी झाला असून त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच कुटुंबातील एक सदस्य मात्र वयाच्या ४५ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
सुपरस्टार रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahni) वयाच्या ४५ व्या वर्षी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, तिच्या पहिल्याच चित्रपटात ती 'कॉमेडी किंग' कपिल शर्मा आणि स्वतःची आई नीतू कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रिद्धिमा कपूर ज्या चित्रपटातून पदार्पण करत आहे, त्याचं नाव आहे 'दादी की शादी' (Dadi Ki Shaadi).
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यात कौटुंबिक ड्रामा, विनोद आणि इमोशन्सची जबरदस्त मेजवानी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फॅशन आणि ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रात नाव कमावलेली रिद्धिमा अभिनयात काय कमाल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कपिल शर्मा, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि सादिया खतीब यांच्यासह अनेक कलाकार दिसत आहेत. चित्रपटाचे शीर्षकच अत्यंत रंजक असल्याने, हा चित्रपट एका आजीच्या लग्नाभोवती फिरणाऱ्या गमतीजमतींवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रदर्शनाची तारीख ठरली!
रिद्धिमाच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'दादी की शादी' हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रिद्धिमा कपूरने २००६ साली बिझनेसमन भरत साहनीसोबत लग्नगाठ बांधली होती. तिला समायरा ही वर्षांची मुलगी आहे. रिद्धिमा दिसायला खूप सुंदर असून अनेकदा तिला तू अभिनेत्री का झाली नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता. आता अखेर ती वयाच्या ४५ व्या वर्षी पदार्पण करत आहे.