"वडिलांना गणवेशात पाहतचं मोठी झालेय...", अभिनेत्रीनं सैनिकांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:45 IST2025-05-11T14:45:30+5:302025-05-11T14:45:46+5:30
"एका सैनिकाच्या घरापासून दुसऱ्या सैनिकाच्या घरापर्यंत, प्रेम, शक्ती आणि सलाम पाठवतेय...", अभिनेत्रीची हृदयस्पर्शी पोस्ट!

"वडिलांना गणवेशात पाहतचं मोठी झालेय...", अभिनेत्रीनं सैनिकांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली!
India Pakistan War: भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला तणाव आणि हल्ले थांबले असून अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर, युद्धविराम लागू झाला. पाकिस्तानसोबत युद्धबंदी जाहीर झाली असली तरी भारतीय सेना डोळ्यात तेल घालून पाकिस्तानच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तर दुसरीकडे युद्धाच्या परिस्थितीत कोणतीही वाईट बातमी कानावर पडू नये अशी प्रार्थना सैनिकांचे कुटुंब मनोमन करत आहेत. अशातच अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेही (Ria Chakraborty) एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत सैनिकांप्रती आपलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.
रिया चक्रवर्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहलं, "एका सैनिकाची मुलगी असल्याने... मी माझ्या वडिलांना गणवेशातील पाहतचं मोठी झाले. तर आईला सैनिकासारखंच अश्रू रोखताना पाहिलंय. अनेकदा अभिमानाने भीतीचा हात शांतपणे धरलाय. आज मी सुरक्षित झोपतेय, कारण कोणाचे तरी वडील, आई, भाऊ आणि बहीण सीमेवर आहेत. सर्व आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स कुटुंबाच्या भावना मी अनुभवू शकते आणि तुमच्यासोबत उभी आहे. एका सैनिकाच्या घरापासून दुसऱ्या सैनिकाच्या घरापर्यंत, प्रेम, शक्ती आणि सलाम पाठवतेय... जय हिंद", या भावनिक शब्दांत रियाने लष्करी कुटुंबांचं दुःख आणि त्याग मांडला.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमध्ये झालेल्या युद्धविरामात अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने तात्पुरता समेट झाला होता. मात्र काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य पूर्ण सज्ज आहे आणि देशातील सेलिब्रिटीही भावनिक पद्धतीने देशाच्या पाठीशी उभे राहात आहेत.