"घरी लोकांची ये-जा मला आवडत नाही" अभिनेत्री रेणुका शहाणे काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:18 IST2025-10-08T11:16:06+5:302025-10-08T11:18:41+5:30
लग्नानंतर बड्या हिंदी कुटुंबात सून म्हणून राहताना रेणुका शहाणे यांना आलेला 'तो' थकवणारा अनुभव

"घरी लोकांची ये-जा मला आवडत नाही" अभिनेत्री रेणुका शहाणे काय म्हणाल्या?
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेते आशुतोष राणा हे बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक मानले जातात. २००१ मध्ये या दोघांनी विवाह केला. रेणुका शहाणे यांचा मराठमोळा आणि अत्यंत गोड स्वभाव सर्वांना परिचित आहे. मात्र, हिंदी भाषिक आणि मोठ्या कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागला, असा खुलासा रेणुका शहाणे यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये केला आहे.
रेणुका शहाणे यांनी नुकतीच 'अमुक तमुक' या पाॅडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान रेणुका शहाणे म्हणाल्या की, "मला माझ्या घरी लोकं आलेली आवडत नाहीत. लग्न झाल्यानंतर माझ्यासाठी हा मोठा धक्का होता की, एकही दिवस आम्ही फक्त दोघेच असे घरी कधी नव्हतो. सतत कोणीतरी असायचं, त्यांचं जगणंच तसं असतं. माझ्या नणंदा किंवा मोठे दीर त्यांच्याही घराचं दार कायम उघडं असतं की, कधीही कोणीही यावं, भरपूर जेवावं आणि जावं. मी अजिबात तशी नाहीये".
त्या म्हणाल्या, "माझं घर म्हणजे माझ्यासाठी एकांतवास आहे. मला लक्षात आलं की, लग्नानंतर मी पहिली पाच-सहा वर्ष सकाळ ते संध्याकाळ येणाऱ्या लोकांना खायला घाला, त्याचं मनोरंजन करा असंच सुरू आहे. त्यावेळी मुलंही लहान होती. हे दोन्ही मॅनेज करणं, मोठं कुटुंब असल्याने ते कधी कधी मुंबईला येऊन राहायचे तेव्हा त्यांच्या सेवेत असणं... तर मी थकले. मला वाटलं की, मी असं नाही जगू शकत".
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेणुका यांनी एकदा आशुतोष राणा यांच्याशी थेट संवाद साधला. त्यांनी राणा यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांना घरी सतत येणाऱ्या लोकांमुळे थकवा जाणवत आहे आणि हे कमी करावे लागेल. रेणुका यांचा मुद्दा शांतपणे ऐकून घेतल्यानंतर आशुतोष राणा म्हणाले, "हे आधीच का नाही सांगितलं?". रेणुका म्हणाल्या, "आपण अनेकदा अशी अपेक्षा ठेवतो की, समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट दिसली नाही का किंवा त्यांनी ओळखलं नाही का? तर, नसेल ओळखलं त्यांनी, तुम्हाला जर ते महत्त्वाचं वाटतंय तर तुम्ही ते सांगायला हवं".