"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:22 IST2025-10-07T13:21:43+5:302025-10-07T13:22:13+5:30
रेणुका यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत संसार थाटला. त्यांना दोन मुलंही आहेत. पण, त्यांना आशुतोष राणा यांच्याशी लग्न करायचं नव्हतं.

"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
रेणुका शहाणे या सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली. हम आपके है कौन, तमाचा, सर आँखों पर, एक अलग मौसम हे त्यांचे गाजलेले हिंदी सिनेमे. आज रेणुका शहाणे यांचा वाढदिवस आहे. रेणुका यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत संसार थाटला. त्यांना दोन मुलंही आहेत. पण, त्यांना आशुतोष राणा यांच्याशी लग्न करायचं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी याचा खुलासा केला आहे.
रेणुका यांनी अमुक तमुक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. आशुतोष राणा यांच्या नात्याबद्दल त्या म्हणाल्या, "खरं तर आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं. आम्ही एकमेकांना डेट करत होतो. आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो. रिलेशनशिपमध्ये तर होतोच. कारण, लग्नाबद्दल नाही म्हटलं तरी त्या काळातही भीती होतीच. आणि आम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहोत तिथे सगळ्याच बाबतीत लोकांचं एक म्हणणं असतं. राणाजी आणि माझ्यात तर इतकं अंतर आहे. ते अत्यंत आस्तिक आहेत आणि मी नास्तिक आहे. म्हणजे आमच्या घरात देवघरच नव्हतं".
"आमच्या देवघरात ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती होती. वारकरी संप्रदायाचा माझ्यावर प्रभाव आहे. तर ते असे जे आदर्श आहे, त्यांच्याबद्दल मला खूप आस्था वाटते. पण, नाही म्हटलं तरी देवळात देव नाही. तर त्यामुळे राणाजींना ती पण एक भीती होती. कारण, त्यांचं कुटुंब हे पूर्ण धार्मिक आहे. त्यांचे अध्यात्मिक गुरुजी होते देवप्रभाकर शास्त्री. त्यांना आम्ही दद्दाजी म्हणायचो. आम्ही जेव्हा डेट करत होतो तेव्हा ते आमच्या आयुष्यातले एक अविभाज्य घटक होते. दद्दाजींनी राणाजींना सांगितलं की मी तुझ्यासाठी बायको निवडली आहे ती म्हणजे रेणुका", असं त्यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या, "पहिला प्रश्न राणाजींनी त्यांना हाच विचारला की ती तर नास्तिक आहे दद्दाजी. तर मग आमचं कसं काय लग्न होणार? तर ते म्हणाले की तू स्वत:ला आस्तिक आणि तिला नास्तिक का मानतोस? तुझे जर १० कार्यक्रम असतील तर ती किती कार्यक्रमांना जात असेल? तर राणाजी म्हणाले की तिला जमले तर १० नाहीतर ८ वगैरे. मग त्यांनी विचारलं की तू तिच्या किती कार्यक्रमांना जातोस. तर ते ४ वगैरे म्हणाले. मग दद्दाजी म्हणाले की खरी आस्तिक कोण आहे? त्यामुळे मी सांगतोय लग्न कर. आपण या गोष्टीच्या मुळापर्यंत जातच नाही".