Amitabh bachchan birthday : या कारणामुळे अमिताभ बच्चन साजरा करणार नाहीत त्यांचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 09:36 IST2018-10-11T09:33:30+5:302018-10-11T09:36:12+5:30
अमिताभ बच्चन यांचा हा ७६ वा वाढदिवस असून हा वाढदिवस ते कुठे साजरा करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण ते आज वाढदिवस साजरा करणार नाहीत.

Amitabh bachchan birthday : या कारणामुळे अमिताभ बच्चन साजरा करणार नाहीत त्यांचा वाढदिवस
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज (११ आॅक्टोबर) वाढदिवस. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. अमिताभ यांनी देखील ट्विटरवरून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून लिहिले आहे की, माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो.
अमिताभ बच्चन यांचा हा ७६ वा वाढदिवस असून हा वाढदिवस ते कुठे साजरा करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण ते आज वाढदिवस साजरा करणार नाहीत असे वृत्त बॉलीवूड हंगामा या वेबसाईटने दिले आहे. त्यांनी दिलेल्या बातमीनुसार, अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदाच्या सासऱ्यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले तर श्वेताच्या सासूची आई म्हणजेच कृष्णा राज कपूर यांचे काहीच दिवसापूर्वी निधन झाले. या दोघांसोबतही बच्चन कुटुंबियांचे संबंध चांगले होते त्यामुळेच अमिताभ यांनी हा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे.
अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद, उत्तरप्रदेश येथे झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मुळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली. ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला. अमिताभ याच्या वडिलांनी त्यांचे नाव इन्कलाब ठेवले होते. मात्र कवि सुमित्रानंदन पंत यांच्या सल्लयावरून हरिवंश राय बच्चन यांनी हे नाव बदलून अमिताभ ठेवले. आज अमिताभ शतकातले श्रेष्ठ कलावंत, महानायक असले तरी हा प्रवास सोपा नव्हता. या सुपरस्टारने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.