​रवीना म्हणते, आम्ही सेलिब्रिटी म्हणजे लोकांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 18:13 IST2017-02-08T12:22:34+5:302017-02-08T18:13:40+5:30

- रूपाली मुधोळकर बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडन हिचा ‘दिलवाले’ हा सिनेमा आठवतोय. ४ फेबु्रवारी १९९४ रोजी अजय ...

Raveena says, we celebrity is 'soft target' for the people! | ​रवीना म्हणते, आम्ही सेलिब्रिटी म्हणजे लोकांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’!

​रवीना म्हणते, आम्ही सेलिब्रिटी म्हणजे लोकांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’!

- रूपाली मुधोळकर


बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडन हिचा ‘दिलवाले’ हा सिनेमा आठवतोय. ४ फेबु्रवारी १९९४ रोजी अजय देवगण, सुनील शेट्टी आणि रवीनाचा हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये झळकला होता. गत ४ फेबु्रवारीला या चित्रपटाला २३ वर्षे पूर्ण झालीत. नेमक्या या निमित्ताने बॉलिवूडच्या ‘मस्त मस्त गर्ल’ने ‘सीएनएक्स मस्ती’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच गप्पांचा हा सारांश प्रश्नोत्तर रूपात खास आमच्या वाचकांसाठी...



प्रश्न : रवीना ‘दिलवाले’ या चित्रपटाला २३ वर्षे पूर्ण होत आहेत, याबद्दलच्या काय आठवणी आपल्या चाहत्यांशी शेअर करशील?
रवीना : ‘दिलवाले’ माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा आणि आवडता चित्रपट. या चित्रपटाशी माझ्या खूप आठवणी जुळल्या आहेत. त्या सर्व सांगितल्या तर दिवसही कमी पडेल. ऊटी येथे या चित्रपटाचे शूटींग झाले. पण या चित्रपटाच्या गाण्याच्या शूटींगवेळची एक आठवण शेअर करायला आवडेल. या चित्रपटाची सगळी गाणी अतिशय सुंदर होती. मला आठवतं, शूटींगवेळी या गाण्याचे शब्द ऐकून डोळ्यांतून आपसूक अश्रू वाहायला लागायचे.  या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा आनंद काही वेगळाच होता. 

प्रश्न : ‘दिलवाले’च्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली तर तू पुन्हा ती स्वीकारशील?
रवीना :बिल्कुल. अगदी मी करणारच. ‘दिलवाले’चे दिग्दर्शक हॅरी बावेजा मला त्यांची ‘लकी मैस्कॉट’ मानतात. त्यामुळे हॅरीने मला पुन्हा विचारले तर मी एका पायावर तयार असेल.

प्रश्न : रवीना, तू लवकरच ‘दी मदर’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनर्पदार्पण करतेय, त्याबद्दल काय सांगशील?
रवीना : होय, या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट महिला हिंसाचाराविरोधात आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट माझ्याकडे आली,तेव्हा मी त्याला नाही म्हणूच शकले नाही.

प्रश्न : ‘दी मदर’चे काही सीन शूट केल्यानंतर अनेक रात्री तू जागून काढल्यात, असे आम्ही ऐकले?
रवीना : होय, खरे आहे. या चित्रपटाच्या भूमिकेशी मी इतके एकरूप झाले होते की, त्यातून बाहेर पडायला मला बराच वेळ लागला.   बलात्कार, हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या कथा आपण वाचतो, टीव्हीवर पाहतो आणि लगेच विसरतोही. पण अशी घटना आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत घडली तर? ही कल्पनाही अंगावर शहारे आणते. नेमका असाच शहारे आणणारा अनुभव मी शूटींग करताना अनुभवला. तो अनुभव प्रचंड अस्वस्थ करणारा होता. मनातून हादरवून टाकणारा होता. त्यानंतर अनेक रात्री मी जागून काढल्या.

प्रश्न : महिलांवरील बलात्कार, हिंसाचार किंवा अशा तत्सम ज्वलंत विषयांवरील चित्रपटांतून समाजात सकारात्मक बदल घडेल, याची कितपत खात्री तुला वाटते?
रवीना :  अशा ज्वलंत विषयांवरील चित्रपटातून किती बदल घडेल, हे तर मला ठाऊक नाही. पण किमान एक सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यास असे चित्रपट निश्चितपणे यशस्वी होत आहेत. ‘दी मदर’ हा चित्रपटही असाच समाजाला एक चांगला संदेश देणारा चित्रपट आहे.

प्रश्न : चित्रपटसृष्टीत तू २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रवासाकडे कशी बघतेस?
रवीना :  हा प्रवास अतिशय शानदार राहिला. बॉलिवूडमध्ये मला २५ वर्षे झालीत, हे मलाही खरे वाटत नाही. डोळ्यांच्या पापण्या लवतात ना लवतात अगदी तशीच ही २५ वर्षे निघून गेलीत. इंडस्ट्रीत खूप चांगली मानसं भेटलीत. अर्थात काही वाईट अनुभवही आलेत. पण एकंदर माझा हा प्रवास अतिशय सुंदर होता.

प्रश्न : या २५ वर्षांत इंडस्ट्री किती बदलली?
रवीना :  इंडस्ट्रीतील अनुभवांबाबत विचाराल तर, इथे प्रचंड ताण आहे, तणाव आहे. इंडस्ट्रीतील या टेन्शन व प्रेशरशी पुरून उरायचे तर तुमचे मन पोलादी असायला हवे. माझ्यामते, इंडस्ट्रीतील नवी पिढी अशीच पोलादी मनाची आहे. इंडस्ट्री अधिक प्रोफेशनल झालीय. माझ्या मते, हा एक चांगला बदल आहे. आधी चित्रपट बनायला तीन-तीन वर्षे लागायचीत. आता अगदी चार-दोन महिन्यांत चित्रपट बनून तयार असतो. तांत्रिकदृष्ट्या इंडस्ट्री अधिक प्रगत झालीय. हाही एक चांगला बदल आहे.

प्रश्न : सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर ‘ट्रोलिंग’ च्या बळी ठरताना दिसताहेत, याबद्दल तुझे काय मत आहे?
रवीना : होय, मी सुद्धा सोशल मीडियावर ट्रोल झालेय. माझ्या मते, सेलिब्रिटी या लोकांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. जरा काही इकडे तिकडे झाले की, लोक तुमची खिल्ली उडवणार, तुमच्यावर टीका करणार. पण शेवटी ‘इट्स अ पार्ट आॅफ दी गेम’. माझ्यामते, एक पोलादी मन असले की, याचा फारसा ताण येत नाही.

प्रश्न :  गेली काही वर्षे तू चित्रपटांपासून दूर राहिलीस. कॅमेºयापासून स्वत:ला दूर ठेवणे, किती कठीण होते?
रवीना :अजिबात कठीण नव्हते. कारण अभिनयाशिवाय बºयाच गोष्टी माझ्याकडे करण्यासारख्या होत्या. या काळात माझ्या दोन्ही मुलांना मोठं होतांना मी बघू शकले. त्यांचे बालपण जगू शकले.   चित्रपटाच्या आॅफर्स तर भविष्यात अनेक मिळतील. कदाचित हिरोईनचा रोल मिळणार नाही. पण आईचा, आजीचा रोल तर नक्की मिळेल. पण मुलांचे बालपण परत येणार नाही. या काळात मी मुलांसोबत त्यांचे बालपण एन्जॉय केले.

प्रश्न :  रवीना, तुझ्या दोन्ही मुलांनी अ‍ॅनिमल रेस्क्यू प्रोग्राममध्ये मोठे योगदान दिलेय,त्याबद्दल आई म्हणून तुझ्या काय भावना आहेत.
रवीना :  मला खरोखरीच माझ्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटतो. इतक्या लहान वयात ते दोघेही एका संस्थेशी जुळले आहेत. त्यासाठी काम करताहेत, याचा आई म्हणून मला अभिमान आहे. स्वत:च्या हातांनी बनवलेल्या अनेक वस्तू विकून माझ्या मुलांनी ५१ हजार रुपए उभे केलेत आणि ते संस्थेला दिलेत. यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाहीच.

ALSO READ : ​- आणि सलग तीन रात्री झोपू शकली नाही रवीना टंडन
रवीना टंडनने शेअर केला 90च्या दशकातील गर्ल गँगचा फोटो
 

 

Web Title: Raveena says, we celebrity is 'soft target' for the people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.