सलमान खानचा 'सिकंदर' का आपटला? रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, "भलतंच झालं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:03 IST2026-01-19T12:00:06+5:302026-01-19T12:03:32+5:30
'सिकंदर' सिनेमाच्या अपयशानंतर जवळपास एक वर्षानंतर रश्मिका मंदानाने मोठा खुलासा केला आहे.

सलमान खानचा 'सिकंदर' का आपटला? रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, "भलतंच झालं..."
गेल्या वर्षी रिलीज झालेला ए आर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' सिनेमा चांगलाच आपटला. मुख्य अभिनेता भाईजान सलमान खानची जादू काही चालली नाही. तर सध्याची आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदानाची सलमानसोबत जोडी होती त्यालाही फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. सलमानच्या करिअरसाठी महत्वाचा मानला जाणारा हा सिनेमा फ्लॉप झाल्याने चाहत्यांनाही धक्का बसला. आता नुकतंच रश्मिका मंदानाने सिनेमा फ्लॉप होण्याचं मोठं कारण सांगितलं आहे.
'सिकंदर' सिनेमाच्या अपयशानंतर जवळपास एक वर्षानंतर रश्मिका मंदानाने मोठा खुलासा केला आहे. तेलुगू पत्रकार प्रेमा यांना दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली, "मला आठवतंय की मी मुरुगदास सरांबाबत सिनेमाच्या आधी चर्चा केली होती. मात्र नंतर जे झालं ते सगळं भलतंच होतं. मी ऐकलेली स्क्रिप्ट वेगळी होती आणि सिनेमा करताना स्क्रिप्ट वेगळी होती. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात."
ती पुढे म्हणाली, "जेव्हा तुम्ही नरेशन ऐकता तेव्हा गोष्ट वेगळी असते आणि प्रत्यक्षात सिनेमा शूट करताना परफॉर्मन्स, एडिटिंग आणि रिलीजची वेळ पाहता त्या हिशोबाने काही बदल केले जातात. गोष्टी बदलतात आणि हे खूप सामान्य आहे. 'सिकंदर'चंही असंच झालं."
रश्मिका मंदानासाठी गेलं वर्ष खूप खास होतं. छावा' आणि 'द गर्लफ्रेंड' हे दोन ब्लॉकबस्टर सिनेमांचा ती भाग होती सलमानसोबतही तिने पहिल्यांदाच काम केलं मात्र सिनेमाला यश मिळालं नाही. आता रश्मिका 'कॉकटेल २','अॅनिमल पार्क' आणि 'मायसा' या सिनेमांमध्ये दिसणार आहे.