"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:57 IST2025-07-04T10:55:48+5:302025-07-04T10:57:04+5:30
कायदा व सुव्यवस्था कुठे आहे?, बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल

"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आहे. सरकारने आधी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतला. त्याला सर्वांनीच कडाडून विरोध केला. मनसे या निर्णयविरोधात आक्रमक झाली. अखेर सरकारने जीआर रद्द केला. तर आता नुकतंच मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलल्यावरुन एका हिंदी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली. त्यावरुन वातावरण तापलं. आता यावर एका बॉलिवूड अभिनेत्याने ट्वीट करत याचा निषेध व्यक्त केला आहे.
मनसे कायमच परप्रांतियांविरोधात आक्रमक होत आली आहे. मराठी येत नाही आणि बोलणार नाही असं म्हणत हिंदीत बोलणाऱ्यांना अनेकदा मनसेने धडा शिकवला आहे. नुकतंच मीरा रोड येथील एका हॉटेल मालकाला मराठी न बोलण्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हाच व्हिडिओ शेअर करत रणवीर शौरीने (Ranvir Shorey) संताप व्यक्त केला. त्याने ट्वीट करत लिहिले, "हे फारच घृणास्पद आहे. राजकीय फायद्यासाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी राक्षस मोकाट फिरतायेत. देवेंद्रजी, कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?"
This is sickening. Monsters on the loose, looking for attention and political relevance. Where’s L&O, @CMOMaharashtra@Dev_Fadnavis? https://t.co/sMYUMcN1la
— Ranvir Shorey (@RanvirShorey) July 2, 2025
रणवीरच्या या ट्वीटवर एका युजरने त्यालाच उलट प्रश्न विचारला. 'तुम्ही किती वर्षांपासून महाराष्ट्रात राहताय? मराठी शिकण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले?' यावर रणवीरने उत्तर देत लिहिले, "सर्वात आधी तर तुझ्यासारख्या अज्ञात ट्रोलला मी उत्तर देण्यास बांधील नाही. दुसरं म्हणजे, लोकांना मारहाण केल्याने ते एखादी भाषा शिकतील असं वाटत असेल तर तुम्ही मूर्ख आहात. शेवटी, आपलं पोट भरण्यासाठी काम करणाऱ्या असहाय्य नागरिकांना मारहाण करण्यापेक्षा या मुद्द्यासाठी लढण्याचे आणि बदल घडवून आणण्याचे इतरही मार्ग अवलंबता येऊ शकतात."
मीरा रोड येथील हॉटेल मालकाला मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या घटनेचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.