अमिताभ बच्चन, शाहरुखनंतर आता रणवीर सिंह बनला DON, अभिनेत्याचा फर्स्ट लुक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:29 IST2023-08-09T13:27:17+5:302023-08-09T13:29:20+5:30
अमिताभ बच्चन, शाहरुख सारखंच रणवीरलाही प्रेम द्याल अशी अपेक्षा फरहानने व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन, शाहरुखनंतर आता रणवीर सिंह बनला DON, अभिनेत्याचा फर्स्ट लुक समोर
Don 3 : बॉलिवूडच्या इतिहासातील ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक म्हणजे 'डॉन'. 1987 साली पहिल्यांदा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 'डॉन' पडद्यावर साकारला. यानंतर २००६ मध्ये शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) रुपात हे कॅरेक्टर पुन्हा जीवंत झाले. शाहरुखने 'डॉन' आणि 'डॉन 2' या सुपरहिट सिनेमातून जलवा दाखवला. आता दिग्दर्शक फरहान अख्तरने (Farhan Akhtar) 'डॉन 3'ची घोषणा केली आहे. तसंच यावेळी शाहरुख नाही तर रणवीर सिंह 'डॉन' असणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये रणवीर सिंहचा (Ranveer Singh) फर्स्ट लुक समोर आला आहे.
कालच फरहान अख्तरने एक लांबलचक पोस्ट शेअर करत 'डॉन 3'ची घोषणा केली. तसंच शाहरुख खान यावेळी 'डॉन' नसणार हेही त्याने स्पष्ट केले. तर आज रिलीज झालेल्या टीझरमध्ये रणवीर सिंह 'डॉन'च्या रुपात समोर आला आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख सारखंच रणवीरलाही प्रेम द्याल अशी अपेक्षा फरहानने व्यक्त केली आहे. '११ मुल्को की पुलिस मुझको ढुँढ रही है पर पकड पाया है मुझको कौन..मै हुँ डॉन' या डायलॉगसह रणवीरचा चेहरा टीझरमध्ये दिसतो. आता रणवीर 'डॉन' म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
२०२५ मध्ये रिलीज
एक्सेल एंटरटेन्मेंटच्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित 'डॉन 3' २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित पहिल्या दोन भागांमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला. 'डॉन 3' मधून शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा दोघेही आऊट झाले आहेत. तर आता प्रियंकाच्या जागी कियारा अडवाणी असल्याची शक्यता आहे.
नेटकरी नाराज
'डॉन' म्हटलं की शाहरुख खानच डोळ्यासमोरच येतो. 'एसआरके शिवाय डॉन ३ मध्ये ती मजा नाही', 'शाहरुख खानच डॉन' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काही नेचकऱ्यांना मात्र रणवीर सिंहचा लुक पसंतीस पडलाय. आता रणवीर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो का हे २०२५ मध्येच कळेल.