रणवीर सिंग 'शक्तीमान'ची निर्मिती करणार? अभिनेत्याच्या टीमने सांगितलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:36 IST2025-05-30T12:33:57+5:302025-05-30T12:36:33+5:30
रणवीर सिंग 'शक्तीमान' वर चित्रपट बनवणार? शोचे हक्क विकत घेतले?

रणवीर सिंग 'शक्तीमान'ची निर्मिती करणार? अभिनेत्याच्या टीमने सांगितलं सत्य
'शक्तिमान' हा ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो होता. 'शक्तिमान'च्या रुपाने भारतीयांना पहिला सुपरहिरो मिळाला. 'शक्तिमान' मालिका पाहून अनेकांचं बालपण गेलं. २०२२ मध्ये सोनी पिक्चर्स इंडियाने 'शक्तीमान' या चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासूनच या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग शक्तीमानची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. यातच त्यानं अलिकडेच या शोचे हक्क विकत घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता रणवीर सिंग या प्रकल्पाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
रणवीरच्या टीमने अलीकडेच एक निवेदन जारी करत याबद्दल माहिती दिली आहे. "रणवीर सिंगने 'शक्तिमान' प्रकल्पाच्या निर्मितीचे कोणतेही अधिकार मिळवलेले नाहीत. या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही", असं त्यांनी सांगितं. सध्या रणवीर आदित्य धरच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून त्याचा बहुचर्चित 'डॉन ३' अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, 'शक्तीमान' चित्रपटावरून गेल्या एक वर्षापासून वाद सुरू आहे. मुकेश खन्ना यांनी एका पॉडकास्टमध्ये सिद्धार्थ कन्ननशी बोलताना खुलासा केला होता की रणवीरला शक्तीमान व्हायचं आहे. रणवीर सिंगने त्यांची भेट घेतली होती आणि शक्तिमानची भूमिका मिळवण्यासाठी तीन ते चार तास त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला होता. पण, मुकेश खन्ना यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. मुकेश खन्ना म्हणाले होते, "माझ्या मते रणवीर शक्तिमानच्या भूमिकेसाठी योग्य नाही". मात्र त्याच मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगने खलनायक 'तमराज किलविश'ची भूमिका करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. शक्तिमान मालिकेत 'तमराज किलविश'ची भूमिका सुरेंद्र पाल यांनी साकारली होती.
चित्रपट रखडला..
२०२२ मध्ये सोनी पिक्चर्स इंडियाने एका भव्य व्हिडिओद्वारे 'शक्तिमान' या सुपरहिरोवर आधारित मेगा बजेट चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट जवळपास २०० ते ३०० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव देण्याची तयारी केली होती, जेणेकरून हा प्रकल्प ग्लोबल पातळीवर पोहोचावा. चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सुरुवातीला 'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीचे नाव शक्तीमानच्या मुख्य भूमिकेसाठी पुढे आले होते. त्यानंतर रणवीर सिंगचं नाव चर्चेत आलं. 'शक्तिमान' हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला आहे. कोणताही अधिकृत अपडेट नसल्यामुळे चित्रपटाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.